कानपूर : लहान-लहान गोष्टींवरून नाते तुटल्याच्या कथा रोज ऐकायला मिळते; परंतु पत्नीचा एक प्रियकर आहे आणि आजही ती त्याच्यावरच जीवापाड प्रेम करते, हे कळाल्यानंतर नाते न तोडता शांत मनाने तिचे तिच्या प्रियकरासोबत लग्न लावून दिले असल्याची घटना उत्तर प्रदेशातील कानपूर येथे घडली आहे.
या घटनेमुळे ‘हम दिल दे चुके सनम’ या चित्रपटाच्या कथानकाची पुन्हा आठवण झाली आहे. पतीने घेतलेल्या निर्णयाची समाजातील सर्व स्तरातून स्तुती होत आहे.
उत्तर प्रदेशातील कानपुरातील ही घटना आहे. सुजित गुप्ता आणि शांती गुप्ता यांचा विवाह १०० दिवसांपूर्वी झाला. सुजितने हुंडा न घेता लग्न केलेले होते; परंतु आपली पत्नी गुपचूप-गुपचूप कुणाबरोबर तरी बोलत असते, असे लग्नानंतर काही दिवसांतच सुजितच्या लक्षात आले.
सुजितने तिला असे बोलण्यावर बंधन घातले; परंतु यानंतर तिने आत्महत्येचा प्रयत्न केला तर काय करायचे? असा विचार त्याच्या मनात घोळण्यास सुरुवात झाली. त्यापेक्षा आपली पत्नी आणि तिच्या प्रियकराचे लग्न लावून दिले तर आपण सर्व जण सुखी होऊ, असा विचार समोर आला.
त्याने शांत डोक्याने पत्नीकडून तिच्या प्रियकराची माहिती घेऊन त्याची भेट घेतली. रवि यादव नामक तरुणाला भेटल्यानंतर सुजितने त्याच्यासमोर शांतीसोबत लग्न करण्याचा प्रस्ताव ठेवला. हे ऐकताच रवि यादव अगदी आनंदाने लग्नास तयार झाला.
यानंतर सुजितने स्वत: पुढाकार घेत लग्नाची तयारी सुरू केली. समाजातील जाणकार मंडळींपुढे हा विचार मांडला. त्यांनाही तो योग्य वाटला. यानंतर त्याने शांतीच्या माहेरच्या मंडळींनाही राजी केले. यात सरकारचाही सहभाग असावा म्हणून लग्नाची वरात थेट कानपुरातील चकेरी पोलीस ठाण्यात आणण्यात आली.
पोलिसांसमोर सुजितने आपल्या पत्नीचा हात प्रियकर रविच्या हातात सोपविला, यानंतर हनुमान मंदिरात जाऊन रविने शांतीच्या भांगात कुंकू भरून जीवनाची जोडीदार बनविले. या घटनेने तिघांच्या जीवनाचे वाटोळे होणे थांबले.