वृत्तसंस्था :- देशभरात विविध ठिकाणी डॉक्टर व आरोग्याशी संबंधित कर्मचाऱ्यांवर होत असलेल्या हल्ल्यांच्या पार्श्वभूमीवर सरकारकडून संसदेच्या आगामी हिवाळी अधिवेशनात डॉक्टरांच्या सुरक्षेच्या दृष्टिकोनातून महत्त्वपूर्ण विधेयक मांडले जाणार आहे.
नोकरीच्या वेळी डॉक्टर व आरोग्य कर्मचाऱ्यांवर हल्ला केल्यास १० वर्षांपर्यंतची शिक्षा व १० लाख रुपयांपर्यंतच्या दंडाची तरतूद करण्यात आलीय.
यंदाच्या हिवाळी अधिवेशनात हे विधेयक पारित व्हावे, यासाठी आरोग्य मंत्रालय प्रयत्नशील आहे. मंत्रालयाने अंतर्गत सल्लामसलतीमध्ये सहभागी असलेल्या सर्व मंत्रालयांना विधेयकावर लवकरात लवकर आपला सल्ला मांडण्याचे निर्देश दिले आहेत.
विधेयकाच्या मसुद्याला अंतिम स्वरूप देऊन पुढच्या आठवड्यात ते मंत्रिमंडळासमोर मांडले जाणार आहे. कायद्याच्या मसुद्यात डॉक्टर व इतर आरोग्य कर्मचाऱ्यांवर हल्ला केल्यास तीन ते १० वर्षांच्या शिक्षेची तरतूद करण्यात आली आहे.
याशिवाय १० लाख रुपयांचा दंड ठोठावला जाईल. सोबतच हिंसाचार किंवा आरोग्य संस्थांच्या मालमत्तेचे नुकसान केल्यास सहा महिने ते ५ वर्षे शिक्षा आणि ५० हजार ते पाच लाखांपर्यंतच्या दंडाची तरतूद विधेयकात करण्यात आली आहे. संसदेचे हिवाळी अधिवेशन १८ नोव्हेंबरपासून सुरू होणार आहे.