अहमदनगर लाईव्ह 24 टीम/ जयपूर : ‘पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शांतताप्रिय देश म्हणून ओळखल्या जाणाऱ्या भारताची प्रतिमा धुळीस मिळवली. यामुळे आज कोणताही मोठा गुंतवणूकदार देशात येण्यास तयार नाही,’ असा गंभीर आरोप काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी मंगळवारी केंद्रातील मोदी सरकारवर निशाणा साधताना केला.
‘तरुण या देशाची सर्वात मोठी संपत्ती आहेत; पण २१व्या शतकातील भारत आपली हीच संपत्ती वाया घालत आहे,’ असेही ते यावेळी म्हणाले.
राहुल गांधी यांनी मंगळवारी येथील ‘युवा आक्रोश रॅली’ला संबोधित केले. त्यात त्यांनी केंद्र सरकारच्या धोरणांवर सडकून टीका केली. ‘मोदी नागरिकत्व सुधारणा कायदा, राष्ट्रीय नागरिक नोंदणी व राष्ट्रीय लोकसंख्या नोंदणीवर बोलतात; पण तरुणांच्या जिव्हाळ्याचा विषय असणाऱ्या बेरोजगारीवर बोलत नाहीत.
यामुळे बेरोजगारी व अर्थव्यवस्था या २ मुद्यांवर तरुणांच्या मनात प्रचंड चीड निर्माण झाली आहे,’ असे ते म्हणाले. ‘मोदींनी जगातील भारताची प्रतिमा व प्रतिष्ठा धुळीस मिळवली.
आज भारत बलात्काराची राजधानी म्हणून ओळखला जातो; पण मोदींना त्याचे काहीच देणे-घेणे नाही. तुम्ही त्यांना याविषयी प्रश्न केला तर तुमचा आवाज बंदुकीच्या जोरावर दाबला जातो. तरुण या देशाची सर्वात मोठी संपत्ती आहे; पण सरकार देशाची हीच मौल्यवान संपत्ती वाया घालत आहे,’ असे राहुल म्हणाले.