भारत चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर उतरणारा जगातील पहिला देश ठरणार !

Published on -

India News : वेलकम बडी अर्थात सुस्वागत मित्रा असा संवाद साधत चांद्रयान- २ मोहिमेतील ऑर्बिटरने चांद्रयान- ३ मोहिमेतील लँडिंग मॉड्यूलचे स्वागत केले. भारतीय अंतराळ संशोधन संस्था इस्रोने दोन्ही चांद्रयानांमधील संवादाबाबत सोमवारी माहिती दिली.

चांद्रयान-२ मोहिमेतील ऑर्बिटरचा नव्या मोहिमेतील लँडिंग मॉड्यूलशी संपर्क झाल्यामुळे आता आम्हाला लँडरपर्यंत पोहोचण्यासाठी अजून एक मार्ग उपलब्ध झाल्याचे इस्रोने सांगितले.

इस्रोने २०१९ साली राबवलेल्या चांद्रयान- २ मोहिमेसोबत ऑर्बिटर, लँडर व रोव्हर पाठवण्यात आले होते. लँडर चंद्रावर उतरण्यात अपयशी ठरले होते. परंतु ऑर्बिटर अद्यापही पृथ्वीच्या या उपग्रहाभोवती प्रदक्षिणा घालत आहे.

या ऑर्बिटरचा आता चांद्रयान- ३ मोहिमेतील लैंडिंग मॉड्यूलशी संपर्क झाल्याने २३ ऑगस्ट रोजी लँडर चंद्रावर उतरताना त्यावर लक्ष ठेवण्यासाठी हे ऑर्बिटर उपयुक्त ठरू शकते. चांद्रयान- ३ मोहिमेतील इतर उद्दिष्टे साध्य करण्यासाठी लँडरसोबत अनेक अत्याधुनिक तंत्रज्ञानाने सज्ज उपकरणे आहेत. ही मोहीम यशस्वी ठरली तर भारत चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर उतरणारा जगातील पहिला देश ठरेल.

चंद्राच्या कायम अंधारात असणाऱ्या दक्षिण ध्रुवाची लँडरवरील कॅमेऱ्याने काढलेली छायाचित्रे सोमवारी इस्रोने जारी केली. लँडर हजार्ड डिटेक्शन अँड अव्हॉइडन्स कॅमेरा अर्थात एलएचडीएसी असे या कॅमेऱ्याचे नाव आहे. इस्रोच्या अहमदाबाद येथील प्रमुख संशोधन व विकास केंद्राने हा कॅमेरा विकसित केला आहे.

लॅडरच्या लैंडिंगसाठी सुरक्षित स्थळ निवडण्यास हा कॅमेरा मदत करतो. चंद्राच्या पृष्ठभागावर अनेक खड्डे आहेत. एलएचडीएसीने पाठवलेल्या छायाचित्रांमध्ये हे स्पष्ट दिसते. त्यामुळे दक्षिण ध्रुवावरील लैंडिंगसाठीचा सखल भाग निवडण्याचे काम एलएचडीएसी करत आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Latest News