जैन धर्मात श्वेतांबर आणि दिगंबर असे दोन प्रमुख पंथ आहेत. या दोन्ही पंथांचे साधू आणि साध्वी दीक्षा घेतल्यानंतर अत्यंत कठोर आणि शिस्तबद्ध जीवन जगतात. त्यांचे जीवन भौतिक सुखसोयी आणि ऐषोआरामापासून पूर्णपणे अलिप्त असते. श्वेतांबर साधू आणि साध्वी केवळ पातळ सूती कापड परिधान करतात, तर दिगंबर साधू कोणतेही वस्त्र धारण करत नाहीत.
जैन साध्वी पांढऱ्या साडीच्या रूपात साधे कापड वापरतात. थंडीच्या कडाक्यापासून ते उष्णतेच्या लाटेपर्यंत, त्यांचे वस्त्र एकच राहते. दिगंबर साधूंना तर हिमवर्षावातही वस्त्र नसते. श्वेतांबर साधू-साध्वी आपल्यासोबत ठेवलेल्या 14 वस्तूंपैकी एक पातळ चादर वापरतात, जी केवळ झोपताना अंगावर घेतली जाते.

या गोष्टी पाळतात
जैन साधू आणि साध्वी कोणत्याही परिस्थितीत जमिनीवरच झोपतात. ही जमीन मोकळी, लाकडाने झाकलेली किंवा चटईवर असू शकते. काही वेळा ते कोरड्या गवताचा आसरा घेतात. त्यांना झोप अत्यंत कमी लागते. विशेषतः दिगंबर साधू तर अगदी कमी वेळ बाजूवर झोपतात.
म्हणून अंघोळ करत नाहीत
सर्वात आश्चर्याची गोष्ट म्हणजे, दीक्षा घेतल्यानंतर जैन साधू आणि साध्वी कधीही पाण्याने आंघोळ करत नाहीत. त्यांच्या श्रद्धेनुसार, आंघोळ केल्याने पाण्यातील सूक्ष्म जीवांचे नुकसान होऊ शकते. याच अहिंसेच्या तत्त्वामुळे ते आंघोळ टाळतात आणि तोंडावर नेहमी कापड ठेवतात, जेणेकरून श्वासाद्वारे कोणतेही सूक्ष्मजीव शरीरात प्रवेश करू नयेत.
शरीर नेहमी स्वच्छ व ताजेतवाने
जैन तत्त्वज्ञानात स्नानाचे दोन प्रकार मानले जातात: बाह्य आणि आंतरिक. सामान्य माणूस पाण्याने बाह्य स्नान करतो, परंतु जैन साधू-साध्वी मन आणि विचारांच्या शुद्धीकरणावर लक्ष केंद्रित करतात. त्यांचे स्नान म्हणजे ध्यान आणि भावनिक शुद्धता.
ते आयुष्यभर या तत्त्वांचे पालन करतात. काही दिवसांच्या अंतराने ते ओल्या कापडाने शरीर पुसतात, ज्यामुळे त्यांचे शरीर नेहमी स्वच्छ आणि ताजे दिसते. यामुळे त्यांना कोणत्याही साबण किंवा पाण्याची गरज भासत नाही.
संयमी जीवनशैली
जैन साधू आणि साध्वी भौतिक साधनांचा पूर्णपणे त्याग करतात आणि साधेपणाने जीवन व्यतीत करतात. परदेशात राहणारे जैन साधू-साध्वीही असेच कठोर जीवन जगतात. जैन समुदाय त्यांना निवारा आणि अन्न पुरवतो, किंवा ते जैन मंदिरांशी संलग्न मठांमध्ये राहतात. त्यांच्या या संयमी जीवनशैलीमुळे ते नेहमीच शारीरिक आणि मानसिकदृष्ट्या ताजेतवाने आणि शुद्ध राहतात, जे त्यांच्या स्वच्छतेचे आणि तेजस्वी व्यक्तिमत्त्वाचे रहस्य आहे.