DA Hike : केंद्र सरकारकडून केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी अनेक निर्णय घेतले जातात. वाढत्या महागाईत कर्मचाऱ्यांना कोणत्याही आर्थिक परिस्थितीचा सामना करावा लागू नये यासाठी केंद्र सरकारकडून कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात वाढ केली जाते.
नवीन वर्ष चालू झाल्यापासून केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी सरकारकडून कोणताही निर्णय घेण्यात आला नाही. अर्थसंकल्पात कोरोना काळातील DA थकबाकीबाबत निर्णय घेतला जाण्याची अपेक्षा कर्मचाऱ्यांना होती मात्र याबाबत सरकारकडून कोणताही निर्णय घेण्यात आला नाही.
केंद्र सरकार वर्षातून दोन वेळा कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता वाढवत असते. मात्र यावेळी कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात कोणतीही वाढ करण्यात आलेली नाही. नवीन वर्षातील पहिल्या महागाई भत्त्यात सरकार लवकरच वाढ करेल अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे.
1 कोटींहून अधिक कर्मचारी आणि पेन्शनधारकांसाठी सध्याच्या 38 टक्क्यांवरून 4 टक्के महागाई भत्ता केंद्र सरकारकडून वाढवला जाणायची शक्यता आहे. हागाई भत्ता (DA) दर महिन्याला कामगार ब्युरोद्वारे जारी केलेल्या औद्योगिक कामगारांसाठी CPI-IW (CPI-IW) च्या आधारावर मोजला जातो.
डीए ४२ टक्क्यांपर्यंत वाढू शकतो
केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात 4 टक्क्यांनी वाढ केल्यानंतर कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता 42 टक्के होईल. सध्या कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता हा 38 टक्के आहे. केंद्र सरकारकडून लवकरच याबाबत निर्णय घेतला जाण्याची शक्यता आहे.
ऑल इंडिया रेल्वेमेन फेडरेशन (एआयआरएफ) सरचिटणीस शिव गोपाल मिश्रा यांनी सांगितले की डिसेंबर २०२२ साठी सीपीआय-आयडब्ल्यू ३१ जानेवारी २०२३ रोजी जारी करण्यात आला. त्यानुसार, महागाई भत्त्यात वाढ 4.23 टक्के आहे. पण केंद्र सरकार महागाई भत्त्यात दशांशाचा समावेश करत नाही.
डीएमधील वाढ कधी लागू होणार?
शिव गोपाल मिश्रा पुढे म्हणाले की, अर्थ मंत्रालयाचा खर्च विभाग महागाई भत्त्यात वाढ करण्याचा प्रस्ताव तयार करेल. त्याचा महसुलावर होणारा परिणामही यात सांगितला जाईल. त्यानंतर हा प्रस्ताव केंद्रीय मंत्रिमंडळासमोर मंजुरीसाठी ठेवला जाईल. 1 जानेवारी 2023 पासून महागाई भत्त्यात वाढ लागू होणार आहे असे ते म्हणाले.