Maharashtra Rain updates : राज्यातील अनेक भागात हवामान बदलामुळे पाऊस पडत आहे. फेब्रुवारीमध्ये अचानक हवामानात बदल झाल्याने शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे. कारण ऐन रब्बी पिकांच्या काढणीवेळी पावसाने हजेरी लावल्याने शेतकऱ्यांच्या समस्या वाढल्या आहेत.
आज सकाळपासून मुंबई, ठाणे, नाशिक, पालघर, जळगाव, धुळे, बुलढाणा, छत्रपती संभाजीनगरमध्ये पाऊस पडत आहे. त्यामुळे हवामान थंड झाले आहे. अचानक आलेल्या पावसामुळे शेतकऱ्यांची चांगलीच धांदल उडाली आहे.
भारतीय हवामान खात्यानुसार पालघर, ठाणे, नाशिक, अहमदनगर जिल्ह्यांत येत्या ३-४ तासांत वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता वर्तवण्यात येत आहे. तसेच वारे ताशी ३०-४० किमी वेगाने वाहण्याचाही इशारा देण्यात आला आहे.
७ मार्च रोजी मराठवाड्यसह, विदर्भात वादळी वाऱ्यासह गारपीट होण्याची शक्यता IMD ने वर्तवली आहे. त्यामुळे रब्बी पिकांची नासाडी होण्याचीही शक्यता आहे. आंबा आणि गहू उत्पादकांना सार्वधिक मोठा फटका बसण्याची शक्यता आहे.
मुंबईमध्ये फेब्रुवारी महिन्यात उष्णेतेची लाट येण्याची शक्यता वर्तवण्यात आली होती. मात्र हवामानात बदल झाल्याने मुंबईमध्ये जास्त उष्णता जाणवली नाही. सध्या महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांमध्ये तापमान 30-35 च्या आसपास आहे.
एक वेस्टर्न डिस्टर्बन्स सक्रिय झाला आहे. त्यामुळे महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यात पावसाची परिस्थिती निर्माण झाली आहे. दुसरीकडे राजस्थान, मध्य प्रदेश, छत्तीसगड आणि गुजरात या राज्यांमध्ये 8 मार्चपर्यंत पावसाची शक्यता आहे.
https://twitter.com/ANI/status/1632678124495466496?s=20
अतिउष्णकटिबंधीय हवामान प्रणालीमुळे या राज्यांमध्ये पाऊस पडत आहे, त्यामुळे काही ठिकाणी गारपीट होण्याची शक्यता आहे. या प्रणालीमुळे, एक वेस्टर्न डिस्टर्बन्स सक्रिय झाला आहे, ज्यामुळे होळीपूर्वी अनेक राज्यांमध्ये पाऊस पडत आहे, परंतु त्याचा प्रभाव 8 मार्च नंतर कमी होईल.
देशातील अनेक डोंगराळ प्रदेशात भारतीय हवामान खात्याकडून पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. आज हिमाचल, उत्तराखंड आणि काश्मीरमध्ये बर्फवृष्टी होण्याची शक्यता आहे तर काही भागात मुसळधार पावसाची शक्यता आहे.