अहमदनगर लाईव्ह 24 टीम / दिल्ली :- भाजपचे ज्येष्ठ नेते व राज्यसभा खासदार सुब्रमण्यम स्वामींनी आता भारतीय नोटांवर लक्ष्मीमातेचे छायाचित्र छापण्याचा सल्ला दिला आहे.
या छायाचित्रामुळे देशाची अर्थव्यवस्था सुधारेल तसेच भारतीय चलनाचे आंतरराष्ट्रीय बाजारातील दर वाढेल, असा युक्तिवादही स्वामींनी पत्रकारांशी बोलताना केला.
मध्यप्रदेशातील खंडवा येथे तीनदिवसीय स्वामी विवेकानंद व्याख्यानमालेच्या समारोप सत्रानंतर सुब्रमण्यम स्वामी यांनी पत्रकारांशी संवाद साधला.
त्यावेळी इंडोनेशियातील नोटांवर भगवान गणेशाचे छायाचित्र असल्याचा मुद्दा पत्रकारांनी स्वामींसमोर उपस्थित केला. त्यावर बोलताना भारतीय चलनावर लक्ष्मीमातेचे छायाचित्र असायला हवे, असे मत स्वामींनी व्यक्त केले. भगवान गणेश विघ्नहर्ता आहेत.
पण देशाच्या चलनाचे मूल्य वाढवायचे असल्यास तसेच अर्थव्यवस्था सुधारायची असल्यास लक्ष्मीमातेचे चित्र उपयुक्त ठरेल. असे केल्यास कुणाला वाईटही वाटणार नाही, असा दावाही त्यांनी केला.
तत्पूर्वी समारोप सत्रात भविष्यातील भारत : समान नागरिक संहिता व लोकसंख्या नियंत्रण याविषयांवरही स्वामींनी भाष्य केले. भारताची वाढती लोकसंख्या ही समस्या नसून, या मनुष्यबळाचा उत्पादकता वाढवण्यासाठी उपयोग केला जावा, असे ते म्हणाले.