पोलिसांसमोरच आरोपी पतीची जमावाकडून हत्या !

Ahmednagarlive24
Published:

लखनऊ :- पत्नीचा खून केल्याचा आरोप असलेल्या आरोपीचा जमावाने पोलिसांसमोरच खून केल्याची घटना उत्तर प्रदेशातील फत्तेपूरमधील सिमौर गावात घडली. फत्तेपूरचे पोलिस अधीक्षक रमेश यांनी सांगितले की, छत्तीसगडमधील विलासपूर येथील नासिर कुरेशी दोन दिवसांपूर्वी त्याची पत्नी अफसरी तथा सोनी हिला घेण्यासाठी तिच्या माहेरी सिमौर गावात आला होता.

बुधवारी दुपारी पती-पत्नीमध्ये वाद झाला. या वादात नासिर याने सोनीवर कुऱ्हाडीने हल्ला केला. यात सोनी हिचा घटनास्थळीच मृत्यू झाला. सोनीला वाचवण्यासाठी गेलेली तिची आई असगरी आणि लहान बहीण शबनमलाही मार लागल्याने दोघी जखमी झाल्या आहेत. प्रत्यक्षदर्शीने दिलेल्या माहितीनुसार, घटनेनंतर माहिती मिळाल्यावर पोलिस आले. पोलिसांना बघून नासिर पळू लागला. मात्र, ग्रामस्थांनी त्याला घेरले आणि काठ्यांनी जबर मारहाण केली.

ग्रामस्थांनी केलेल्या जबर मारहाणीत तो जागीच ठार झाला. पोलिस अधीक्षकांनी सांगितले की, गावात तणाव असून मोठ्या संख्येने पोलिस तैनात करण्यात आले आहेत. घटनेत जखमी झालेल्या दोघींना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. याबाबत गुन्हा दाखल करण्यात आला असून गावकऱ्यांची चौकशी करण्यात येत आहे. पोलिसांनी सांगितले की, पत्नीचे अनैतिक संबंध असल्याच्या संशयावरून नासिरने कुऱ्हाडीने हल्ला केला.

सोनी तिच्या चार मुलांसह गेल्या तीन वर्षांपासून माहेरी राहत होती. मृत सोनीची लहान बहीण शबनमच्या तक्रारीवरून पोलसात गुन्हा दाखल करण्यात आला असून या तक्रारीत नासिरने स्वत:वर कुऱ्हाडीने वार करत आत्महत्या केल्याचे म्हटले आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Leave a Comment