सध्या राज्यातील अनेक शहरांमधून देशातील वेगवेगळ्या राज्यातील महत्त्वाच्या शहरांसाठी विमान सेवा सुरू करण्यात येत असून केंद्र सरकारच्या उडान योजनेअंतर्गत अनेक विमान कंपन्या वेगवेगळ्या शहरांसाठी विमान सेवा सुरू करत आहेत. जर आपण जळगाव विमानतळाच्या दृष्टिकोनातून बघितले तर या ठिकाणची सेवा गेल्या काही वर्षापासून बंद होती.
परंतु आता ‘फ्लाय 91’ विमान कंपनीने पुढाकार घेतल्यामुळे आता जळगाव विमानतळावरून पुन्हा विमानसेवा सुरू होणार आहे व ही विमानसेवा गोवा आणि हैदराबाद या दोन शहरांना जोडणार आहे. साधारणपणे 18 एप्रिल पासून ही सेवा सुरू करण्याचे कंपनीच्या माध्यमातून जाहीर करण्यात आले
दोन्ही शहरांसाठी बुकिंग देखील सुरू झाली आहे.18 एप्रिल पासून गोवा आणि हैदराबाद आणि मे महिन्यात पुणे शहरासाठी देखील जळगाव वरून विमानसेवा सुरु होण्याची माहिती कंपनीच्या माध्यमातून देण्यात आलेली आहे.
गोवा आणि हैदराबादसाठी बुकिंग सुरू
या फ्लाय 91 विमान कंपनीच्या वेबसाईट आणि एजंटाच्या माध्यमातून आता या दोन्ही शहरांसाठी बुकिंग सुरू असून याला चांगला प्रतिसाद मिळताना दिसून येत आहे. बुकिंगच्या पहिल्याच दिवशी जळगाव ते गोवा व गोवा ते जळगाव अशा दोन्ही कडील साईडच्या 72 सीटपैकी 50 सीट बुक झाले असून हैदराबाद विमानाचे देखील 25 सीट बुक झाल्याची माहिती समोर आलेली आहे.
वाचा हैदराबाद व गोव्यासाठीचे वेळापत्रक आणि तिकीट दर
18 एप्रिल 26 ऑक्टोबर या कालावधी दरम्यान गोव्यावरून दुपारी दोन वाजून पंचवीस मिनिटांनी हे विमान उड्डाण करेल व त्याच दिवशी दुपारी चार वाजून पंधरा मिनिटांनी जळगाव विमानतळावर त्याचे आगमन होईल. तसेच हैदराबादसाठी सायंकाळी चार वाजून 35 मिनिटांनी जळगाव विमानतळावरून उड्डाण करेल व हैदराबादला संध्याकाळी सहा वाजून 30 मिनिटांनी पोहोचेल.
त्यानंतर हैदराबाद वरून त्याच दिवशी संध्याकाळी सात वाजता जळगावकडे उड्डाण करेल व रात्री आठ वाजून 35 मिनिटांनी जळगावला पोहोचेल. त्यानंतर रात्री 8:55 मिनिटांनी जळगाव विमानतळावरून गोव्यासाठी परत हे विमान उड्डाण करेल व रात्री दहा वाजून पाच मिनिटांनी गोव्याला पोहोचेल. ही विमानसेवा जळगाव विमानतळावरून सोमवार, गुरुवार आणि शनिवारी असणार आहे.
जळगाव ते गोवा, हैदराबाद तिकीट दर
‘फ्लाय 91’ विमान कंपनीच्या माध्यमातून सुरू करण्यात येत असलेल्या या विमान सेवेच्या माध्यमातून जळगाव ते गोवा व जळगाव ते हैदराबाद विमान प्रवासाचे तिकीट दर हे १९९१ रुपये इतके आहेत.