अहमदनगर Live24 टीम, 11 डिसेंबर 2020 :- देशात कोरोना काळातील लॉकडाऊनमुळे डिजिटल पेमेंटचे प्रमाण आणखीनच वाढले. गुगल पे, फोन पे आणि पेटीएम ही डिजिटल पेमेंट अॅप युजर्समध्ये विशेष लोकप्रिय आहेत.
एका बँकेतून थेट दुसऱ्या बँकेत पैसे ट्रान्सफर करण्याच्या या पद्धतीला यूनिफाइड पेमेंट्स इंटरफेस म्हणतात. नॅशनल पेमेंटस कॉर्पोरेशन ऑफ इंडियाकडून या सगळ्यावर नियंत्रण ठेवले जाते. भारतात डिजिटल पेमेंट अॅप्स अल्पावधीत लोकप्रिय झाली आहेत.
सध्या देशात यूपीआय पेमेंटच्या माध्यमातून महिन्याला जवळपास 200 कोटीची देवाणघेवाण होते. यामध्ये फोन पे आणि गुगल पे ही अॅप्स सर्वाधिक लोकप्रिय आहेत. या दोन अॅप्सच्या माध्यमातून जवळपास 82 टक्के व्यवहार होतात. गेल्या काही दिवसांपासून सोशल मीडियावर डिजिटल पेमेंटवर आता शुल्क आकारले जाणार असल्याच्या चर्चा ऐकायला मिळत आहेत.
1 जानेवारी 2021 पासून यूपीआयच्या माध्यमातून व्यवहार करणे सशुल्क होणार, असे सांगितले जात आहे. त्यामुळे या अॅप्सचा वापर करणारे युजर्स चांगलेच नाराज झाले होते.
मात्र, या सगळ्या अफवा असल्याचे आता स्पष्ट झाले आहे. या सगळ्या चर्चांच्या पार्श्वभूमीवर नॅशनल पेमेंटस कॉर्पोरेशन ऑफ इंडियाकडून (NPCI) ट्विट करून स्पष्टीकरण देण्यात आले आहे. आगामी वर्षात डिजिटल पेमेंटसाठी कोणतेही अतिरिक्त शुल्क द्यावे लागणार नाही, असे NPCI कडून सांगण्यात आले आहे.
- अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com