Satellite Tolling : केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी राष्ट्रीय महामार्गांवरील टोल शुल्कासंदर्भात एक महत्त्वपूर्ण आणि ऐतिहासिक घोषणा केली आहे. गेल्या काही काळात टोल शुल्क, टोलनाक्यांवरील रांगा आणि वेळेचा अपव्यय यावरून नागरिकांमध्ये तीव्र नाराजी होती. याच पार्श्वभूमीवर गडकरींनी जाहीर केलं आहे की, येत्या १५ दिवसांत अशी टोल पॉलिसी येणार आहे की “टोलबद्दल तुमची कोणतीही तक्रार उरणार नाही.”
सॅटलाईट बेस्ड टोलिंग म्हणजे नेमकं काय?
सॅटलाईट बेस्ड फ्री टोलिंग सिस्टम ही एक अत्याधुनिक प्रणाली आहे, जिथे वाहनांना टोलनाक्यांवर थांबण्याची गरज भासत नाही. यामध्ये रस्त्यांवर बसवलेले कॅमेरे आणि जीपीएस तंत्रज्ञानाच्या मदतीने वाहनाची नंबर प्लेट स्कॅन केली जाईल. वाहन कोणत्या ठिकाणाहून निघाले आणि कुठपर्यंत प्रवास केला हे ओळखून, त्या अंतरावर आधारित टोलची रक्कम थेट वाहनधारकाच्या बँक खात्यातून वसूल केली जाईल. यामुळे ना रांगा लागणार, ना रोख व्यवहार, ना वेळेचा अपव्यय.

फास्ट टॅगनंतरचा पुढचा टप्पा
सध्या देशात फास्ट टॅग प्रणाली लागू करण्यात आली आहे, ज्यामुळे काही प्रमाणात रांगा कमी झाल्या आहेत. मात्र तरीही वाहनचालकांना काही काळासाठी तरी थांबावे लागते. सॅटलाईट टोल सिस्टीम हे या समस्येवरचे अंतिम उत्तर ठरणार आहे. गडकरी म्हणाले की, “पंधरा दिवसांत अशी नवी टोल पॉलिसी येणार आहे की टोलबद्दल कोणतीही तक्रार उरणार नाही.”
थेट बँक खात्यातून वसुली
या नव्या प्रणालीत टोल भरण्यासाठी कोणतेही गेट्स, कर्मचार्यांची गरज, रोख रक्कम किंवा QR कोड स्कॅन करणे आवश्यक नाही. वाहन क्रमांक आणि बँक खाते लिंक असले की, वाहनाचं अंतर ओळखून संबंधित टोलची रक्कम थेट खात्यातून कापली जाईल. त्यामुळे संपूर्ण प्रक्रिया पारदर्शक, जलद आणि डिजिटल होणार आहे.
टोलमध्ये १०० टक्के कपात?
गेल्या आठवड्यातही गडकरींनी सूचित केलं होतं की सरकार टोल कमी करण्याच्या दिशेने काम करत आहे. तेव्हा त्यांनी टोल रक्कम १०० टक्के कमी करण्याचा विचार सुरू असल्याचं स्पष्ट केलं होतं. आता त्यांच्या नव्या वक्तव्यानुसार, या दिशेने निर्णय लवकरच घेतले जाणार असून राष्ट्रीय महामार्गांवरून प्रवास करणाऱ्यांसाठी मोठा दिलासा मिळण्याची शक्यता आहे.
महाराष्ट्र नाही, संपूर्ण देशासाठी धोरण
गडकरी यांनी स्पष्ट केलं की, हा निर्णय महाराष्ट्रापुरता मर्यादित नाही. ते म्हणाले, “मी महाराष्ट्रातील टोलबद्दल बोलत नाहीय. राष्ट्रीय महामार्गांबाबत बोलत आहे.” त्यामुळे ही नवीन टोल पॉलिसी संपूर्ण देशासाठी लागू होणार आहे, आणि त्याचा फायदा लाखो वाहनचालकांना होणार आहे.
सॅटेलाइट आधारित टोल प्रणाली: काय आहे आणि कशी काम करेल?
नितीन गडकरी यांनी सॅटेलाइट आधारित टोल संकलन प्रणाली (Global Navigation Satellite System – GNSS) बद्दल माहिती देताना सांगितलं की, ही यंत्रणा वाहनचालकांना टोलनाक्यांवर थांबण्याची गरज संपवेल. या प्रणालीची प्रमुख वैशिष्ट्ये खालीलप्रमाणे:
टोलनाके बंद: पारंपरिक टोल बूथ पूर्णपणे हटवले जातील, आणि वाहनांना कोणीही अडवणार नाही.
स्वयंचलित टोल संकलन: वाहनाच्या नंबरप्लेटचा फोटो कॅमेऱ्याद्वारे (Automatic Number Plate Recognition – ANPR) काढला जाईल, आणि सॅटेलाइटद्वारे वाहनाचा प्रवास ट्रॅक केला जाईल.
अंतरावर आधारित शुल्क: वाहनाने राष्ट्रीय महामार्गावर कापलेल्या अंतरानुसार टोल आकारला जाईल. उदाहरणार्थ, जर तुम्ही पुणे ते अहिल्यानगर प्रवास केला, तर फक्त त्या अंतराचा टोल आकारला जाईल.
बँक खात्यातून कपात: टोलची रक्कम थेट वाहनचालकाच्या बँक खात्यातून किंवा डिजिटल वॉलेटमधून कापली जाईल, ज्यामुळे रोख किंवा फास्टॅगची गरज भासणार नाही.
वेळ आणि इंधन बचत: टोलनाक्यांवरील रांगा संपल्याने वाहनचालकांचा वेळ आणि इंधन वाचेल, आणि प्रवास अधिक कार्यक्षम होईल.
गडकरी यांनी स्पष्ट केलं की, ही प्रणाली राष्ट्रीय महामार्गांवर लागू होईल, आणि सध्या महाराष्ट्रातील स्थानिक टोलनाक्यांबाबत कोणताही निर्णय जाहीर केलेला नाही. ही प्रणाली लागू झाल्यास पुणे-अहिल्यानगर रस्त्यावरील प्रवास अधिक जलद आणि त्रासमुक्त होण्याची शक्यता आहे.