अहमदनगर Live24 ,27 मे 2020 :-पाटणा कोरोनाच्या पार्श्वभूमीवर देशभरात लॉकडाऊन करण्यात आले. या काळात अनेक मजूर देशभरात विविध ठिकाणी अडकून पडले.
त्यांना त्यांच्या ठिकाणी पोहोच करण्यासाठी श्रमिक रेल्वेही सुरु करण्यात आल्या. परंतु मजुरांचे त्या ठिकाणीही हाल झाले. अपघातात मृत्यूमुखी पडल्याच्या घटना ताज्या असतानाच सोमवारी श्रमिक विशेष रेल्वेने प्रवास करणाऱ्या सात प्रवासी मजुरांचा मृत्यू झाला आहे.
विशेष म्हणजे हा मृत्यू उष्णता व भुकेवाचून झाला आहे. कोरोनाशी मुकाबला करण्यापूर्वीच अन्नपाण्याची कमतरता आणि वाढता उन्हाळा हे मोठे संकट मजुरांसमोर उभे राहिले आहे.
प्रवासी मजूर प्रवास करीत असलेल्या श्रमिक विशेष रेल्वे अनेक ठिकाणी उशिराने धावत आहेत. ज्या रेल्वेचा पल्ला लांबचा आहे, त्या रेल्वे निर्धारित ठिकाणी पोहचण्यात फारच वेळ लावत आहेत.
या प्रवासात अन्नपाण्यावाचून आणि उष्णतेमुळे मजुरांना प्राणाला मुकावे लागत आहे. सोमवारी श्रमिक विशेष रेल्वेने प्रवास करणाऱ्या सात प्रवासी मजुरांचा मृत्यू झाला आहे. यात एका आठ महिन्यांच्या लहानग्याचाही समावेश आहे.
पश्चिम चंपारण जिल्ह्यातील रहिवासी इरशाद यांचा मुजफ्फरपूर जंक्शन येथे, 55 वर्षीय अनवर यांचा बैरोनी येथे, सूरतहून बिहारकडे येणाऱ्या रेल्वेत औरंगाबाद जिल्ह्यातील रहिवासी असलेल्या महिलेचा सासाराम स्टेशनवर तर महाराष्ट्रातून येणाऱ्या मोतिहारीच्या मजुराचा जहानाबादमध्ये मृत्यू झाला.
रेल्वेला होणारा विलंब आणि रेल्वेतील अन्नपाणी सुविधेबाबत पूर्व मध्य रेल्वेचे जनसंपर्क अधिकारी राजेश कुमार यांच्याकडे याबाबत विचारणा केली असता, कोणत्याही मजुराचा भूकेमुळे मृत्यू झाला नसल्याचे त्यांनी सांगितले आहे.
यातील काही मजुरांना रुग्णालयात दाखल केल्यानंतर त्यांचा मृत्यू झाल्याचेही रेल्वे अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे. श्रमिक विशेष रेल्वेतून प्रवास करणाऱ्या मजुरांना सकाळी नाश्त्यापासून ते रात्रीच्या भोजनापर्यंत रेल्वेतर्फे वेळेवर जेवण दिले जात असल्याचा दावाही त्यांनी केला आहे.
मात्र लांब पल्ल्याच्या गाड्यांना काहीसा विलंब होत असल्याचे त्यांनी सांगितले आहे. मात्र कोणतीही रेल्वे ही पाच किंवा सात दिवसांच्या उशिराने धावत नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे.
अहमदनगर Live24 वर तुमच्या बातम्या / माहिती तसेच जाहिरातीसाठी संपर्क करा [email protected] वर
जॉईन व्हा आमच्या फेसबुक ग्रुपमध्ये
https://www.facebook.com/groups/Ahmednagarlivenews
This Story First Publish on Ahmednagarlive24.com