मद्यसम्राट विजय मल्ल्या झाला कंगाल; झालीये अशी अवस्था

Ahmednagarlive24
Published:

अहमदनगर Live24 टीम, 13 डिसेंबर 2020 :-भारतीय बँकेचं कर्ज बूडवून परदेशात पळून गेलेला उद्योगपती आणि मद्यसम्राट विजय मल्ल्या आता कंगाल झाला आहे.

सध्या विजय मल्ल्या याच्याकडे वकिलाला देण्यासाठी देखील पैसे नसल्याचं समोर आलं आहे. कोर्ट कचेऱ्यांचा फेरा मागे लागल्याने आर्थिक नाकेबंदी झाल्याने मल्ल्याकडे वकिलांना देण्याइतपतही पैसे नाहीत.

त्यामुळे वेळेत फी नाही दिली तर खटला लढणार नसल्याचा इशारा त्याच्या वकिलाने दिला आहे. त्यामुळे मल्ल्याची डोकेदुखी वाढली आहे.

भारतात ऐषो-आरामी जीवन जगणाऱ्या आणि मौजमजा करण्यासाठी कोट्यवधींची उधळपट्टी करणाऱ्या विजय मल्ल्याला लंडनमध्ये आता पै-पैचा हिशोब ठेवावा लागत आहे.

वकिलाची फी देण्यासाठीही विजय मल्ल्याकडे आता पैसे नाहीत. त्याच्या वैयक्तिक खर्चावर आता पूर्णपणे बंधने आली आहेत. आर्थिक चणचणीमुळे कोंडीत सापडलेल्या मल्ल्याने लंडनच्या उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे.

फ्रान्समधील मालमत्ता विकल्यानंतर आलेल्या रकमेपैकी 14 कोटी रुपये आपल्याला देण्यात यावेत, अशी विनंती त्याने या याचिकेतून कोर्टाला केली आहे. लंडनमध्ये मल्ल्याच्या बाजूने खटला लढवणाऱ्या वकिलाला त्याची फी मिळाली नाही.

त्यामुळे या वकिलाने पुढच्या सुनावणीपर्यंत रकम न मिळाल्यास खटला लढणे बंद करणार असल्याचं स्पष्ट केलं आहे. मल्ल्याची सर्व संपत्ती लंडनच्या उच्च न्यायालयाने आपल्या निगराणीखाली ठेवली आहे.

कोर्टात प्रकरण सुरू असेपर्यंत मल्ल्याला ही संपत्ती विकता येणार नाही किंवा त्याला ही संपत्ती तारण ठेवून कुणाकडूनही कर्ज घेता येणार नाही. त्यामुळे त्याची मोठी आर्थिक नाकेबंदी झाली आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Leave a Comment