जागतिक आर्थिक अनिश्चिततेच्या सावटाखाली भारतातील नोकरी बाजारपेठ मात्र स्थिर आणि आशादायक चित्र दाखवत आहे. इंडीडच्या ताज्या ‘हायरिंग ट्रॅकर’ अहवालानुसार, २०२५च्या जानेवारी ते मार्च या तिमाहीत ८२ टक्के कंपन्यांनी सक्रियपणे भरती केली. ही आकडेवारी मागील तिमाहीच्या तुलनेत ३ टक्क्यांनी जास्त आहे. विशेष म्हणजे, फ्रेशर्स आणि तंत्रज्ञानाशी संबंधित क्षेत्रे जसे की सॉफ्टवेअर डेव्हलपमेंट, डेटा अॅनालिटिक्स आणि कृत्रिम बुद्धिमत्ता (एआय) यांना भरतीत प्राधान्य मिळत आहे.
कंपन्यांकडून काळजीपूर्वक निवड
नोकरी बाजारपेठ सतत बदलत आहे. कंपन्या सावधपणे, पण आशावादी दृष्टिकोन ठेवून भरती करत आहेत. फ्रेशर्सची मागणी स्थिर आहे, पण कंपन्या त्यांच्या निवडीसाठी खूप काळजीपूर्वक निर्णय घेत आहेत, असे इंडीड इंडियाचे विक्री प्रमुख शशी कुमार यांनी सांगितले. तंत्रज्ञानातील कौशल्यांबरोबरच लवचिकता आणि शिकण्याची तयारी असलेले उमेदवार कंपन्यांना हवे आहेत.

आर्थिक वर्ष २०२६ साठी नियोजन करताना कंपन्यांनी फ्रेशर्सवर विशेष लक्ष केंद्रित केले आहे. गेल्या तिमाहीत ५३ टक्के भरती फ्रेशर्ससाठी होती. यात सॉफ्टवेअर डेव्हलपर (२९ टक्के), डेटा अॅनालिस्ट/सायंटिस्ट (२६ टक्के) आणि सेल्स एक्झिक्युटिव्ह (२३ टक्के) या भूमिका आघाडीवर होत्या. एआय, मशीन लर्निंग, सायबर सुरक्षा आणि सॉफ्टवेअर डेव्हलपमेंटमधील प्रशिक्षित फ्रेशर्सना कंपन्या प्राधान्य देत आहेत.
फ्रेशर्समध्ये कौशल्याची कमतरता
मात्र, ३८ टक्के नियोक्त्यांनी सांगितले की, फ्रेशर्समध्ये कौशल्याची कमतरता ही मोठी अडचण आहे. बऱ्याच उमेदवारांकडे तांत्रिक ज्ञान आहे, पण प्रत्यक्ष अनुभवाचा अभाव त्यांच्या कार्यक्षमतेत अडथळा आणतो. शिवाय, २७ टक्के नियोक्त्यांच्या मते, संवाद, वेळेचे व्यवस्थापन आणि सहकार्य यासारख्या सॉफ्ट स्किल्सचा अभावही दिसतो. फ्रेशर्स आता वेतनाबाबतही जागरूक झाले आहेत. ७२ टक्के नियोक्त्यांनी सांगितले की, फ्रेशर्सच्या वेतनात थोडी वाढ झाली आहे, पण ती मर्यादित आहे. सुमारे ६० टक्के नोकरी शोधणाऱ्यांनी सांगितले की, वेतनवाढ फक्त ५ टक्क्यांपर्यंतच मर्यादित आहे. तरीही, बहुतांश फ्रेशर्स वेतनाच्या बाबतीत तडजोड करायला तयार नाहीत.
२०२५ मध्ये फ्रेशर्ससाठी सरासरी प्रारंभिक पगार सुमारे ३.५ लाख रुपये प्रतिवर्ष आहे. ५८ टक्के नियोक्त्यांनी ३ ते ५ लाख रुपये प्रतिवर्ष दरम्यान पगारपॅकेज ऑफर केले, जे ६७ टक्के फ्रेशर्सच्या अपेक्षांशी जुळते. पण वेतनाबरोबरच आकर्षक काम, शिकण्याच्या संधी आणि चांगली कार्यसंस्कृती यालाही फ्रेशर्स महत्त्व देत आहेत. तरीही, वेतन हा त्यांच्यासाठी सर्वात मोठा घटक आहे.
एआय, डेटा सायन्स, सायबर सुरक्षा क्षेत्रात जादा संधी
इंडीडच्या सर्वेक्षणात ३४ टक्क्यांहून अधिक नियोक्त्यांनी सांगितले की, ते एप्रिल ते जून २०२५ या तिमाहीत फ्रेशर्सची भरती करतील. एआय, डेटा सायन्स आणि सायबर सुरक्षा या क्षेत्रांत संधी जास्त आहेत. नियोक्त्यांनी असेही नमूद केले की, स्पष्ट जबाबदाऱ्या, कार्यसंस्कृती आणि नोकरीचे स्वरूप सांगणाऱ्या कंपन्यांकडे फ्रेशर्सचा कल जास्त आहे. भारतातील नोकरी बाजारपेठ तंत्रज्ञान आणि कृत्रिम बुद्धिमत्तेवर अवलंबून असल्याचे या अहवालातून स्पष्ट होते.