आयुष्यामध्ये जर तुम्हाला मोठे व्हायचे असेल किंवा एखाद्या अधिकारी पदाला गवसणी घालायची असेल तर त्याकरता तुम्ही म्हणजेच तुमची कौटुंबिक पार्श्वभूमी ही श्रीमंत किंवा आर्थिक दृष्ट्या सक्षमच असावी असे काही नसते. तुमच्यामध्ये जर जिद्द असेल आणि काहीतरी करून दाखवण्याची उर्मी असेल तर तुम्ही नक्कीच कुठल्याही परिस्थितीशी दोन हात करत यशाच्या शिखरापर्यंत पोहोचतात.
आजकाल आपण अनेक तरुण आणि तरुणी पाहत आहोत की यूपीएससी आणि एमपीएससी सारख्या स्पर्धा परीक्षांमध्ये अगदी शेतकरी कुटुंबातीलच नाही तर मजुरी करणाऱ्या कुटुंबातील मुला मुली देखील आयएएस आणि आयपीएस सारख्या पदांना गवसणी घालताना आपल्याला मागच्या काही वर्षापासून दिसून येत आहे.
यामागे काहीतरी मिळवण्याची जिद्द आणि मनात ठासून ठेवलेले ध्येय गाठण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्टा करण्याची तयारी हे गुण असतात. अगदी याच प्रमाणे घरात प्रचंड प्रमाणात दारिद्र्य असताना शेळ्या वळत घरच्यांना आर्थिक दृष्ट्या हातभार लावत बुलढाणा जिल्ह्यातील कोलवड येथील रोहिणी अनिल गवई या तरुणीने जपानला भरारी घेतली असून त्या ठिकाणी लाखो रुपयांचे पॅकेज मिळवले आहे.
रोहिणी ताईनी मिळवले जपानमध्ये लाखो रुपयांचे पॅकेज
याबाबत सविस्तर वृत्त असे की, बुलढाणा जिल्ह्यातील कोलवड या गावच्या रोहिणी अनिल गवई यांची घरची परिस्थिती हलाखीची तसेच वडील मजुरी काम करणारे असून आर्थिक परिस्थिती बिकट असल्यामुळे रोहिणी ताईंना उच्च शिक्षण घेणे अगदी अशक्य होते.
त्यामुळे रोहिणी ताईने दहा बकऱ्या वळत घरच्या उत्पन्नामध्ये थोडीफार भर टाकण्याचा प्रयत्न केला. आर्थिक परिस्थिती नसल्यामुळे उच्च शिक्षण घेणे अशक्य असल्यामुळे हार न मानता दहावीनंतर कृषी पदविकेला प्रवेश घेतला व त्यासोबतच बुलढाण्यातील ‘बो ट्री फाउंडेशन’ च्या माध्यमातून जपानी भाषा शिकण्याचा प्रयत्न केला व जपानी भाषा शिकत त्यासंबंधीची आवश्यक परीक्षा उत्तीर्ण केली.
याच परीक्षेच्या आधारावर आज 18 वर्षाच्या रोहिणी यांची जपान या ठिकाणच्या एका कंपनीमध्ये निवड झाली. बुलढाण्यातील जी काही बो ट्री फाउंडेशन ही संस्था आहे या संस्थेच्या संपर्कामध्ये जपान या देशातील अनेक उद्योग आहेत. या संस्थेने रोहिणी यांचा संपूर्ण तपशीला सह अर्ज जपान येथील काही कंपन्यांकडे पाठवलेला होता.
अखेर संस्थेच्या या धडपडीला यश आले आणि रोहिणी यांना जपान मधील एका अन्नप्रक्रिया उद्योग समूहातील कंपनीमध्ये नोकरी मिळाली. एवढेच नाही तर या कंपनीने रोहिणी यांना नियुक्तीपत्र व सोबत व्हिजा सुद्धा पाठवला. या कंपनीने रोहिणी यांना एक लाख 58 हजार रुपये प्रति महिना पगार निश्चित केलेला आहे.
रोहिणी यांच्या मागे आहे वडिलांची खंबीर साथ
जपानमध्ये चांगले पॅकेज मिळाले परंतु त्या देशात जाण्यासाठी लागणारे तिकिटाचे पैसे मात्र रोहिणी यांच्याकडे नव्हते. खूप प्रयत्न करून पाहिले तरी पैशांची जुळवा जुळव मात्र होऊ शकली नाही.
परंतु लेकीच्या मागची बापाची सावली मागून हटली नाही व बापाने लेकीसाठी स्वतःचे घर गहाण ठेवले व व्याजाने पैसे काढून तिकिटाचे तीन लाख रुपये जमा केले. शेवटी अखेर रोहिणी ताई शनिवारी मुंबई व मुंबईवरून जपान या देशाकडे रवाना झाल्या.
यावरून आपल्याला दिसून येते की माणसाच्या अंगी जबर इच्छाशक्ती आणि एखादे ध्येय असेल व ते पूर्ण करण्यासाठी कुठल्याही प्रकारची कष्ट करण्याची तयारी असेल तर कुठलीही गोष्ट अशक्य नसते.