अवैध वाळू वाहतूक करणारा ट्रक कर्जत पोलिसांनी पकडला

अवैध वाळू वाहतूक करणारा ट्रक कर्जत तालुक्यातील मांदळी येथे कर्जत पोलिसांनी कारवाई करत पकडला आहे. दरम्यान पोलिसांनी याप्रकरणी एकावर गुन्हा दाखल केला आहे.

याबाबत अधिक माहिती अशी कि, मिरजगावकडून मांदळीच्या दिशेने एक ट्रक अवैध वाळू चोरून बेकायदेशीररित्या वाहतूक करत आहे. खात्रीशीर माहिती मिळताच पोलिसांनी सापळा लावून मांदळी बस थांब्याजवळ सदरील निळ्या रंगाचा ट्रक अडवला.

ट्रक ड्रायव्हर किरण नेमीचंद वाळुंजकर, राहणार कानडी बुद्रुक, तालुका आष्टी, जिल्हा बीड याला ताब्यात घेतले. वाळू वाहतूक करण्याचा कुठलाही परवाना नसताना तो वाळू वाहतूक करत होता.

पोलीस कॉन्स्टेबल सुनील दिलीप खैरे यांच्या फिर्यादीवरून वाळू तस्करी करणारा किरण नेमीचंद वाळुंजकर याच्यावर गुन्हा दाखल केला असून न्यायालयाने दोन दिवसांची पोलीस कोठडी दिली आहे. वाळू वाहतूक करणारा ट्रक व वाळू असा 3 लाख 10 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.