Sugarcane Workers : साखर कारखान्यांची मदार जशी ऊस उत्पादक शेतकऱ्यांवर आहे, तशीच ऊसतोड मजुरांवरदेखील आहे. हे ऊसतोड मजूर दुष्काळी पद्यातील भूमिहीन, अल्पभूधारक, रोजंदारीचे काम करणारे मजूर आहेत. बीड, जालना, औरंगाबाद, अहमदनगर जिल्हा हे ऊसतोड मजुरांचा पुरवठा करतात.
शेती क्षेत्रात निर्माण झालेली अरिष्टे आणि पर्यायी रोजगारांची अनुपलब्धता, या कारणांनी हे मजूर ऊसतोडणीच्या क्षेत्रातील मजूर म्हणून उपलब्ध होतात. या मजुरांमध्ये पुरुषांच्या बरोबरीने महिलादेखील असतात. हे मजूर ऊसतोडणीसाठी चार ते सहा महिन्यांसाठी (ऑक्टोबर ते एप्रिल) हंगामी स्वरुपात विविध साखर कारखान्यांवर स्थलांतर करतात. या हंगामात दुष्काळाचे सावट निश्चितच असणार आहे.
सन २०२० साली झालेला राज्य साखर संघ आणि ऊसतोडणी कामगार, वाहतूकदार व मुकादम, यांचा मजुरी भाववाढीचा करार संपुष्टात आला आहे. नवीन करार करण्यासाठी राज्य साखर संघ व ऊसतोडणी कामगारांच्या ७ संघटना यांच्यात १४ डिसेंबर २०२३ पर्यंत ४ बैठका झाल्या.
मात्र, ऊसतोड मजुरांच्या भाववाढीच्या मागणीस साखर संघाकडून सकारात्मक प्रतिसाद मिळाला नाही. या झालेल्या बैठकांमध्ये ऊसतोड कामगार संघटनांनी ५० टक्के भाववाढ देण्याची मागणी केली आहे. तर राज्य साखर संघाने २७ टक्के भाववाढ देण्याचा प्रस्ताव ठेवला.
राज्य साखर संघाने ५० टक्के भाववाढ केली नाहीतर २५ डिसेंबरपासून ऊसतोड बंदचा निर्णय कामगार संघटनांनी घेतला होता. त्यावर राज्य साखर संघाकडून पाचवी बैठक घेण्याचा निर्णय घेण्यात आला. दि. २७ डिसेंबर २०२३ रोजी ऊसतोड कामगार संघटनांची राज्य साखर संघाबरोबर पाचवी बैठक निष्फळ ठरली.
त्यामुळे सकारात्मक निर्णय झाला नाही. ऑक्टोबर २०२० साली झालेल्या करारावेळी २०२३ मध्ये पुढील भाववाढीचा करार करण्यात येईल, असा निर्णय झाला होता. मात्र, दुष्काळीस्थितीमुळे ऑक्टोबर (२०२३) महिन्यातच करार करण्यात आला नाही.
नवीन करारासंदर्भात ऑक्टोबर महिन्यापासून कामगार संघटनांनी निवेदन दिले होते. त्यास राज्य साखर संघ आणि सहकार विभाग यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला नाही. नव्याने भाववाढ मिळण्यासाठी कामगार संघटना ऑक्टोबर महिन्यातच संप करणार होत्या.
मात्र, दुष्काळी आणि कोरडवाहू परिसरातून कामगार येत असल्याने जनावरांच्या चारा आणि पाणीप्रश्न गंभीर होऊ लागल्याने कामगार संघटनांनी संप न करता निवेदन देऊन व विनंती करून ऊसतोड भाववाढ करण्याची मागणी केली आणि ऊसतोडणीस कारखान्यावर जाणे पसंत केले.
महागाईच्या तुलनेत कामगारांना नियमाप्रमाणे योग्य मोबदला मिळण्यासाठी भाववाढ करार करायला हवा, अशी भूमिका कामगार संघटनांनी घेतली. यासंदर्भात राज्य साखर संघ आणि कामगार संघटना यांच्यात बैठक होणार आहे, अशी माहिती पाथर्डी तालुक्यातील आदिनाथनगर येथील कामगार संघटनेचे सदस्य सचिन फुंदे यांनी दिली.