Agri Machinery:- शेती क्षेत्राचा विचार केला तर यांत्रिकीकरण आता मोठ्या प्रमाणावर झाल्यामुळे शेतीची पूर्व मशागत असो की पीक काढण्याची कामे आता कमीत कमी वेळेमध्ये करणे शक्य झालेली आहे. तसे पाहायला गेले तर शेतीची पूर्व मशागतीची कामे हे तुलनेने कष्टदायक आणि वेळ खाऊ असतात. या कामांसाठी देखील आता अनेक प्रकारचे यंत्र विकसित झाल्यामुळे कमीत कमी वेळेत आणि कमीत कमी खर्चामध्ये शेतकऱ्यांना ही कामे करणे शक्य झालेली आहेत.
तसे पाहायला गेले तर शेतीमध्ये अनेक प्रकारची यंत्र वापरली जातात. परंतु ट्रॅक्टर आणि ट्रॅक्टर संबंधित असलेल्या यंत्रांचा वापर हा मोठ्या प्रमाणावर होत असतो. शेतीमध्ये वापरण्यात येत असलेल्या यंत्रांपैकी जर आपण पावर टिलर या शेतीतील अनेक कामांसाठी उपयोगी पडणारे यंत्र आहे. पावर टिलर हे यंत्र शेतीतील कोणकोणत्या कामांसाठी उपयोगी पडते याबद्दलची माहिती आपण या लेखात घेऊ.
पावर टिलरच्या साह्याने शेतीतील कोणती कामे करता येतात?
पावर टिलर हे यंत्र छोट्या शेतकऱ्यांसाठी खूप फायद्याचे असून या यंत्राच्या साह्याने नांगरणीपासून ते चिखलणी पर्यंत व इतर अंतर्मशागतीचे कामे करता येतात. तसेच पाण्याच्या पंप चालवण्यासाठी, औषधांची फवारणी तसेच भात भरडणे, ऊस पिकाची अंतर मशागत तसेच तेलाचे घाणे चालवणे इत्यादी कामे या यंत्राच्या माध्यमातून करणे शक्य आहे. पावर टिलर या यंत्राचा वापर ऊस पिकासाठी मोठ्या प्रमाणावर होत असून ऊस बांधणी सारख्या कष्टदायक कामासाठी या यंत्राचा वापर केला जातो.
फळबागेत झाडाच्या बुंध्यांपर्यंत मशागत करण्याकरिता तसेच तन नियंत्रणासाठी आवश्यक आंतर मशागत तसेच उच्च दाबाने जर औषध फवारणी करायची असेल तर त्यासाठी देखील या यंत्राचा वापर केला जाऊ शकतो. एवढेच काय तर पावर टिलर च्या साह्याने विद्युत जनित्र चालवले जाऊ शकतात व या माध्यमातून विजेची निर्मिती करता येऊ शकते.
दळण कांडप यंत्रणा व तेल घाण्यामध्ये देखील यंत्राचा वापर होतो. या यंत्राची रचना पाहिली तर हे सहजरित्या हाताळता येणारे उपकरण असून त्याच्या पुढील गतीचे सहा व मागील गतीचे दोन ते चार गेअर असतात. या यंत्राच्या गती नियंत्रणामध्ये गिअर सोबतच एक्सिलेटरचा वापर देखील करता येतो.
पावर टिलरला कोणती उपकरणे जोडता येऊ शकतात?
1- ट्रॉली– पाचशे किलो ते दीड टना पर्यंत मालाचे वाहतूक या ट्रेलरच्या माध्यमातून करता येणे शक्य आहे. या ट्रेलरला ब्रेकची व्यवस्था असल्याने अडचणीतून वाहतूक करता येऊ शकते.
2- कापणी यंत्र– हे यंत्र छोट्या भात आणि गहू उत्पादक शेतकऱ्यांसाठी खूप फायद्याचे असून एका वेळेला सहा ते सात मजुरांचे काम अत्यंत वेगामध्ये व कोणतेही नुकसान न करतापूर्ण होते. एवढेच नाही तर बार्ली गवत व नाचणी सारख्या पिकांची कापणी देखील करता येते.
3- पलटीचे नांगर व कल्टीवेटर– खोल नांगरणी करिता आपण पलटीचा नांगर वापरतो व नांगरणी करिता पलटी चा वापर उपयुक्त असून रोटावेटर यंत्रणा बाजूला करून त्या ऐवजी पलटी फाळ नांगर या माध्यमातून जोडता येतो. एवढेच नाही तर या यंत्राला कल्टीवेटर देखील जोडता येते. कल्टीवेटर हे फळबागा तसेच वनशेती मशागती करिता खूप फायद्याचे आहे.
4- रोटावेटर– हे पावर टिलर चे महत्वाचे उपकरण असून याने नांगरट तसेच ढेकळे बारीक करण्याचे काम केले जाते. तसेच जुन्या पिकांचे अवशेष बारीक करण्यासाठी व चिखलणी करणे यासाठी रोटावेटर चा वापर होतो. यंत्र देखील पावर टिलर ला जोडता येते.
5- पाणी उपसा पंप– या यंत्राच्या साह्याने विहीर, शेततळे तसेच तलाव इत्यादी मधील पाण्याचा उपसा देखील करता येतो. पावर टिलर च्या पुढे अथवा हॅन्ड वेलरवर अगर स्वतंत्र ब्रॅकेटर पंप बसवता येतो.