Ahmednagar News : शेती क्षेत्रात थोडेसे पारंपरिक पद्धतीच्या परिघाबाहेर जाऊन बदल केले तर नक्कीच किमया घडते. अशीच किमया अहमदनगरमधील एका शेतकऱ्याने करून दाखवली आहे.
नेवासे तालुका हा तसा उसाचा पट्टा असणारे क्षेत्र. परंतु या तालुक्यातील देडगाव येथील शेतकऱ्याने आपल्या शेतात सफरचंदाची बाग फुलवलीये. या प्रयोगशील युवा शेतकऱ्याचे नाव आहे आदिनाथ मुंगसे.
काश्मीर नव्हे देडगाव..
सफरचंद म्हटले की आपल्याला काश्मीर आठवतो. पण हेच पीक देडगाव येथे पिकवले आहे आदिनाथ मुंगसे यांनी. ताजी गुलाबी सफरचंदे घेण्यासाठी पंचक्रोशीतून ग्राहक या सफरचंदाच्या बागेला भेट देत आहे.
सफरचंद हे कश्मीर हिमाचल या थंड प्रदेशातील फळ असून, या फळबागेचा आपल्या परिसरात लागवड करून त्याचे उत्पादन घेण्याचा विचारही आजवर कोणी केला नव्हता. मात्र, देडगावच्या या नवनवीन प्रयोग करणाऱ्या प्रगतिशील युवक शेतकऱ्याने कश्मीरमध्ये येणारे हे फळ आपल्याकडे येऊ शकते का याचा विचार करून त्याचे उत्पादन घेण्याचे ठरवले.
त्याप्रमाणे २०२१ मध्ये हिमाचल प्रदेशातून हार्मोन – ९९ या जातीचे सफरचंदाचे २५० रोपे आणून त्याची ३० गुंठ्यांमध्ये लागवड केली. रासायनिक खताचा वापर न करता फक्त शेण खत वापरून चार वर्षांतच सफरचंदाची झाडे अतिशय चांगली आली असून तिसऱ्या वर्षीच या झाडांना फळे लागली होती.
शंभर रुपये किलोप्रमाणे जागेवर विक्री
मागील वर्षीच्या अतिवृष्टीने नुकसान झाले. यंदा मात्र प्रत्येक झाडाला साधारण दहा किलो फळे लागलेली आहेत. फळांचा रंग अतिशय चांगला आहे, चवही चांगली असल्याने आपल्याकडच्या या सफरचंदाच्या बागेचे कुतूहल परिसरातील सर्व शेतकऱ्यांना वाटत
असून या दर्जेदार ताजे सफरचंद घेण्यासाठी सध्या पंचक्रोशीतून या सफरचंदाच्या बागेत ग्राहक येत असून जागेवरच शेतकरी शंभर रुपये किलोप्रमाणे ताजे सफरचंद ग्राहकांना देत आहे.
शेतकऱ्याचा झालेला खर्च
– २५० रोपांच्या लागवडीचा खर्च ६५ हजार.
– तीन वर्षांत शेणखत २५ हजार
– तीन वर्षात खुरपणी व गवत काढणे खर्च एक लाख.
– पहिल्या तोड्यात उत्पन्न अडीच लाख