अहिल्यानगर जिल्ह्यातील केळी पोहोचली थेट इराणला ! ३ एकर बागेतून ८ लाखांचं उत्पन्न

Published on -

अहिल्यानगर जिल्ह्यातील कोल्हार गावातील प्रयोगशील शेतकरी गणेश निबे यांनी ऊस शेतीऐवजी केळी शेतीकडे वळून मोठं यश मिळवलं आहे. त्यांनी आपल्या शेतात घेतलेल्या केळीच्या पिकाला थेट इराणसारख्या परदेशातून मागणी आली आहे. या केळीला स्थानिक बाजारात मिळणाऱ्या दरापेक्षा जास्त दर मिळाल्यामुळे निबे यांनी सुमारे ८ लाख रुपयांचं उत्पन्न मिळवलं आहे.

सुरुवात छोट्यापासून, स्वप्न मोठं

गणेश निबे यांनी २०१३ साली केळीची शेती सुरू केली होती. सुरुवातीला त्यांनी आपला माल स्थानिक बाजारात विकला. पण, आपल्या केळीला देशभरात आणि परदेशात पोहोचवायचं स्वप्न त्यांनी मनात ठेवलं. त्यासाठी त्यांनी अनेक प्रयोग केले, बाग जुनी झाली की मोडून टाकली आणि नवीन लागवड केली.

तीन एकरात ४५०० झाडांची बाग

२०२४ मध्ये त्यांनी तीन एकरात जी-९ प्रकाराच्या ४५०० केळीची लागवड केली. झाडांमध्ये योग्य अंतर ठेवून, वेळेवर पाणी, सेंद्रिय आणि रासायनिक खतांचा संतुलित वापर, ठिबक सिंचन आणि कीटक नियंत्रण व्यवस्थित केल्याने केळीचा दर्जा खूप चांगला आला.

१०० टनांहून अधिक उत्पादन

या वर्षी त्यांना एकूण १०० टनांहून अधिक केळीचं उत्पादन अपेक्षित आहे. त्यातील पहिल्या टप्प्यात ५० टन केळी कापणी झाली. यातील २३ टन केळी स्थानिक बाजारात ११ रुपये किलोने विकली, तर उरलेली २७ टन केळी इराणमध्ये २० रुपये किलो दराने निर्यात झाली.

सोशल मीडियाचा योग्य वापर

हे यश मिळवण्यासाठी गणेश निबे यांनी सोशल मीडियाचा योग्य वापर केला, शेतीमध्ये शिस्त पाळली आणि व्यवस्थापन उत्तम ठेवलं. त्यांनी सांगितलं की, “पैसा तर मिळाला, पण आपल्या गावातून परदेशात केळी गेली, ही खरी मोठी कमाई आहे.”

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe