Soybean MSP Center:- सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांची जर आपण परिस्थिती बघितली तर मागील वर्षापासून अतिशय तुटपुंज्या दराने सोयाबीनची खरेदी केली जात असल्यामुळे सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना खूप मोठ्या प्रमाणावर फटका बसल्याचे आपल्याला दिसून येत आहे.
तसेच यावर्षी देखील सोयाबीनच्या दर हे घसरलेलेच असून बऱ्याच ठिकाणी हमीभावापेक्षा देखील कमी दराने सोयाबीनची खरेदी केली जात आहे. परंतु या पार्श्वभूमीवर सोयाबीनची हमीभावाने खरेदी करता यावी याकरिता राज्यामध्ये सोयाबीन खरेदी केंद्र उभारण्याचे निश्चित करण्यात आले व त्यानुसार काही ठिकाणी सोयाबीन खरेदी केंद्र सुरू देखील करण्यात आले.
परंतु या केंद्रांवर ज्या सोयाबीनची ओलावा मर्यादा 12% आहे किंवा 12% ओलावा असलेल्या सोयाबीनचेच खरेदी या केंद्रांवर केली जात होती. परंतु आता सोयाबीनमधील ओलावा मर्यादा 12 टक्क्यांवरून 15 टक्के करण्याचा निर्णय केंद्र सरकारच्या माध्यमातून घेण्यात आला आहे व त्यामुळे नक्की सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा मिळणार आहे.
आता 12 नाही तर 15 टक्के ओलावा मर्यादा असलेल्या सोयाबीनची देखील केली जाईल हमीभावाने खरेदी
याबाबत सविस्तर वृत्त असे की, राज्यामध्ये विधानसभा निवडणुकीची धामधूम सध्या सुरू असून यामध्येच केंद्र सरकारने सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा देण्याच्या दृष्टिकोनातून एक महत्त्वाचा निर्णय घेतला.
केंद्र सरकारने रविवारी 15 टक्के ओलावा असलेल्या सोयाबीनची देखील खरेदी हमीभावाने करण्याचा निर्णय घेतला असल्याची माहिती केंद्रीय कृषिमंत्री शिवराज सिंह चौहान यांनी दिली आहे.
तसेच याबाबतचा आदेश केंद्रीय कृषी मंत्रालयाच्या माध्यमातून जारी करण्यात आलेला आहे. त्यामुळे आता ए वन कॉलिटीचे सोयाबीनच नाही तर सर्व प्रकारच्या सोयाबीनची खरेदी हमीभावाने केली जाणार आहे.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी काय दिल्या सूचना?
या प्रश्नावर मुख्यमंत्री यांनी देखील सूचना दिल्या असून त्यामध्ये त्यांनी राज्यात सोयाबीनचे खरेदीकेंद्र वाढवून सोयाबीनची खरेदी 4892 रुपयांनी केली जाईल असे त्यांनी जाहीर केले आहे.तसेच कापूस आणि सोयाबीन पिकांसाठी खरेदी केंद्रांची संख्या वाढवण्यासोबतच खरेदी प्रक्रिया सुरळीत व पारदर्शक ठेवण्याच्या सूचना देखील मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिल्या आहेत.
इतकेच नाही तर खरेदी केंद्रांवर आवश्यक त्या सगळ्या सुविधा उपलब्ध करून देण्याचे निर्देश देखील त्यांनी दिल्याची माहिती समोर आली आहे. केंद्र सरकारने कापूस आणि सोयाबीन हमीभावामध्ये याआधी वाढ केलेली आहे.
परंतु आता खरेदी केंद्राची संख्या वाढवण्याची विनंती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केंद्रीय वाणिज्य मंत्री पियुष गोयल यांच्याकडे केली होती व त्यांनी देखील आता सकारात्मक प्रतिसाद दिला असल्यामुळे राज्यात खरेदी केंद्रांची संख्या वाढेल अशी एक शक्यता निर्माण झाली आहे. मुख्यमंत्र्यांनी हमीभाव वाढवण्यासाठी केंद्र सरकारकडे पाठपुरावा केला होता व त्यात त्यांना यश देखील आले.
कापसाच्या अनुषंगाने बघितले तर मध्यम धागा कापूस 7121 रुपये प्रति क्विंटल, लांब धाग्याचा कापूस 7521 रुपये प्रतिक्विंटल असे हमीभाव 2024-25 साठी जाहीर झाले. गेल्या वर्षीच्या तुलनेत पाहिले तर यामध्ये 501 रुपयांनी वाढ पाहायला मिळत आहे. कापूसच नाहीतर सोयाबीन पिकाच्या देखील हमीभावात वाढ करण्यात आलेली आहे.