शेतकरी सध्या पूर्णपणे शेतीवर अवलंबून राहत नाहीत. निसर्गाचा लहरीपणा जास्त वाढल्याने पिकाचे शाश्वत उत्पन्न मिळत नाही. त्यामुळे शेतकरी जोडधंदा म्हणून दुग्ध व्यवसायात उतरले आहेत. यासाठी शेतकरी अनेक दुभते जनावरे पाळतो. यात म्हैस, गायी आदींचे पालन करतो. सध्या मार्केटमध्ये गाईच्या दुधापेक्षा म्हशीच्या दुधाला जास्त मागणी वाढली आहे.
तसेच म्हशीच्या दुधात फॅट जास्त असल्याने अनेक डेअरी प्रोडक्ट तयार करण्यासाठी याचा वापर करतात. त्यामुळे जर तुम्हाला दुग्ध व्यवसाय सुरु करायचा असेल तर म्हैसपालन उपयुक्त ठरेल. यासाठी तुम्ही म्हशींमधील मुर्रा जातीची म्हैस पाळणे गरजेचे आहे. कारण या जातीच्या म्हैस दूध तर जास्त देतातच परंतु इतरही फायदे होतात. चला या बद्दल सविस्तर माहिती घेऊयात –
मुर्रा जातीच्या म्हशींविषयी थोडेसे –
म्हशीच्या विविध प्रगत जाती आहेत. या जातींपैकी एक म्हणजे मुर्रा. जास्त दूध देण्यासाठी प्रसिद्ध आहे. या म्हशीचा उगम भारतातील हरियाणा आणि पंजाब राज्यात पाहायला मिळतो. भिवानी, हिस्सार, रोहतक, जिंद, झाझर, फतेहाबाद आणि गुडगाव या जिल्ह्यांमध्ये म्हैसपालन केले जाते. तुम्हाला ऐकून आश्चर्य वाटेल पण
मुर्रा जातीच्या म्हशी इटली, बल्गेरिया आणि इजिप्त सारख्या देशांमध्ये दुग्धशाळेतील म्हशींचे दूध उत्पादन वाढवण्यासाठी पाळल्या जातात.
एका दिवसात 30 लिटर दूध
ही म्हैस दूध द्यायला एकदम भन्नाट. योग्य काळजी घेतल्यास ही म्हैस दररोज 20 ते 30 लिटर दूध देऊ शकते. म्हणजे एकच म्हैस तुम्हाला दिवसाला 1800 रुपयांचे दूध देते. दूध जास्त असल्याने या म्हशींची किंमतही जास्त आहे. एका मुर्रा म्हशीची किंमत 50 हजार ते 2 लाख रुपयांपर्यंत असते. या म्हशीचा गर्भधारणा कालावधी सुमारे 310 दिवसांचा असतो. योग्य देखभाल केल्यास दुधाचे प्रचंड उत्पन्न तुम्ही काढू शकता.
मुर्रा जातीची म्हैस कशी ओळखावी? तिची वैशिष्ट्ये काय आहेत?
– या जातीची पहिली ओळख म्हणजे ही सर्वात जास्त दुभती म्हैस आहे. साधारण 30 लिटर दूध ही म्हैस देऊ शकते.
– या म्हशीच्या डोक्यावर, शेपटीवर आणि पायावरही भुरके रंगाचे केस आढळतात.
– ही म्हैस भारतात सर्वत्र आढळते. परंतु दिल्ली, पंजाब आणि हरियाणामध्ये जास्त प्रमाणात आहे.
– शिंगावरूनही या जातीची पारख केली जाते. या जातीच्या म्हशीची शिंगे जिलेबीसारखी घुमावदार असतात.
– रंग एकदम काळा कुळकुळीत असतो.
– मुर्रा जातीच्या म्हशींचे डोके लहान आणि लांब शेपूट असते. यावरून देखील याची पारख करता येते.