कापूस उत्पादक शेतकरी संकटात !केलेला खर्चही पदरात पडत नसल्यामुळे शेतकरी चिंतातूर

Sonali Shelar
Published:
Ahmednagar News

Ahmednagar News : शेवगाव तालुक्यात जवळपास ८९ टक्के शेतकऱ्यांनी कापसाची लागवड केली होती; परंतु कमी पाऊस झाल्यामुळे अत्यंत कमी प्रमाणात कापसाचे उत्पादन झाले. किमान प्रतिक्विंटल दहा हजार रुपये दर शेतकऱ्यांच्या पदरात मिळेल, अशी आशा शेतकऱ्यांना होती;

परंतु पाच ते सहा हजार रुपये दर मिळत असल्याने शेतकऱ्यांच्या पदरी निराशा येत असल्याने तालुक्यातील शेतकरी संकटात सापडला आहे.

शेवगाव तालुक्यातील सीसीआय हमीभाव केंद्राकडून शेतकऱ्यांना सात हजार वीस रुपये प्रतिक्विंटल प्रमाणे दर मिळत होता; परंतू हे सीसीआय केंद्र अनेक दिवसापासून बंद आहे.

त्याचा फायदा घेऊन खासगी व्यापारी शेतकऱ्यांना सहा हजार आठशे रुपये दर देतो म्हणतात आणि शेतकऱ्यांनी कापूस विक्रीला आणल्यानंतर कापूस कमी दर्जाचा असल्याचे कारण देऊन साडेपाच ते सहा हजार रुपये दराने कापूस खरेदी करतात,

त्यामुळे शेतकऱ्यांना कापूस विक्री केल्याशिवाय पर्याय राहत नाही. शेतकऱ्यांनी केलेला खर्चही शेतकऱ्यांच्या पदरात पडत नसल्यामुळे शेतकरी चिंतातूर झालेला आहे. शासनाने तातडीने सीसीआय खरेदी केंद्र सुरू करावे,

अशी मागणी शेवगाव तालुक्यातील शेतकऱ्यांकडून होत आहे. याबाबत तातडीने सुधारणा न झाल्यास स्वाभिमानी शेतकरी संघटना तीव्र आंदोलन करून लोकप्रतिनिधींना जाब विचारेल, असा इशारा स्वाभिमानीचे जिल्हा उपाध्यक्ष दत्तात्रय फुंदे यांनी लेखी निवेदनाद्वारे दिला आहे.

निवेदनावर रावसाहेब लवांडे, संतोष गायकवाड, मेजर भोसले, संदीप मोटकर बाळासाहेब फटांगडे, अमोल देवढे, नारायण पायघन, राजू औटी, रमेश कुसळकर, आदी शेतकऱ्यांच्या सह्या आहेत.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe