अहमदनगर जिल्ह्याचा उत्तर भाग तसा तुलनेत सुजलाम सुफलाम आहे. कारण तेथे कॅनॉलचे पाणी आहे. आणि पाणलोटात पाऊसही चांगला होतो. त्यामुळे या भागातील शेतकरी नगदी पिकास जास्त प्राधान्य देतात.
त्यामुळे उत्तरेत शक्यतो उसाला जास्त प्राधान्य दिल जायचं. त्यामुळे उत्तरेत कारखान्याची संख्याही तुलनेत जास्तच आहे. परंतु बदलते हवामान, निसर्गाचा लहरीपणा, वाढते रोगराईचे प्रमाण यामुळे ऊस पिकाला उतरती कळा लागली आहे असे चित्र दिसत आहे.

उसाच्या आगारात पांढरे सोने
उसाचे आगार अशी ओळख असलेल्या नेवासे तालुक्यात यंदा कापसाने चकाकी घेतली आहे. उसाऐवजी शेतकऱ्यांनी पांढऱ्या सोन्याची वाट धरली असल्याने कापसाचे तालुक्यात विक्रमी उत्पादन अपेक्षित आहे.
साखर उद्योगाला मात्र ही धोक्याची घंटा मानली जात आहे. कमी पर्जन्यमान, उसावरच्या रोगकिडी व दर एकरी ३० ते ३५ हजारांचा उत्पादन खर्च आणि दर एकरी कमी उत्पन्न यामुळे हतबल ऊस उत्पादकांनी यंदा उसाकडे पाठ फिरवली.
नेवासे तालुक्यातील देवगाव, देडगाव, जेऊर हैबती, तेलकुडगाव, माका, शिरसगाव, गेवराई, भेंडे, तरवडी, अंतरवाली, वाकडी आदी भागात ८० टक्के उसाची लागवड केली जायची.
परंतु यंदा येथील शेतकऱ्यांनी कापूस उत्पादित केला आहे. कापसाचा दर एकरी उत्पादन खर्च दहा हजाराच्या आत आहे. त्यामुळे दर एकरी उत्पादन खर्चही वाचला असल्याचे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे.
नेवासे तालुक्यात होणार विक्रमी आवक
नेवासे तालुक्यात यंदा कापसाची विक्रमी आवक असणार आहे. नेवासे तालुक्यात कापूस २९ हजार ७९६ हेक्टर, ऊस २५ हजार १८० हेक्टर, सोयाबीन १२ हजार ४६ हेक्टर, बाजरी ३ हजार ६९ हेक्टर, मका १ हजार ३६६ हेक्टर पेरणी झाली. नेवासे तालुक्यात यंदा कापसाचे सर्वाधिक पीक असल्याने कापसाची आवकही विक्रमी होणार आहे.
कारखान्यांना धोक्याची घंटा
उसाचे क्षेत्र कमी होणे हे कारखान्यांना धोक्याची घंटा आहे. उत्तरेत कारखाने बरेच आहेत. परंतु जे उसाची मारामार झाल्यास ऊस बाहेरून आणावे लागेल, परिणामी खर्चही जास्त येईल. त्यामुळे पुढील गणिते जुळवताना अडचणी येऊ शकतात