अहमदनगर Live24 टीम, 21 मार्च 2022 Krushi News :- उन्हाळा जसा वाढत जातो तशी शेतीसाठी लागणाऱ्या पाण्याची कमतरता भासू लागते. त्यामुळे जनावरांसाठी लागणारा हिरव्या चाऱ्याची टंचाई निर्माण होते.
जनावरांना हिरवा चारा न मिळाल्याने त्याचा परिणाम हा दूधावर होऊन दुधाच्या उत्पादनात घट होते. जोपर्यंत पावसाळा सुरु होत नाही तोपर्यंत हिरव्या चाऱ्याला जनावरे मुकतात.
तर ज्या ठिकाणी पाण्याची उपलब्धता आहे.अशा ठिकाणी आतापासूनच हिरव्या चाऱ्याची व्यवस्था सहज करता येणार आहे. उन्हाळ्यातील हिरव्या चाऱ्याची कमतरता दूर करण्यासाठी द्विधल असणाऱ्या चवळीचा चारा म्हणून योग्य उपयोग करता येऊ शकतो.
चवळी अधिक पौष्टिक आणि पचण्याजोगे आहे. त्यामुळे जनावरांची दूध उत्पादन क्षमता वाढते. याची सर्वात चांगली गोष्ट म्हणजे यामुळे शेतीची खत क्षमता देखील वाढते.
चवळीची वारंवार कापणी करुनही पुन्हा चारा म्हणून उपयोग करता येतो.तर चवळीच्या लागवडीसाठी पाण्याचा निचरा होणारी जमीन निवडणे गरजेचे असते.
आणि चवळी साठी हलक्या किंवा चांगल्या प्रतीचीच जमिन असणे गरजेचे नाही. तर चवळी पिकासाठी शेत तयार करण्यासाठी शेत जमीन चांगली नांगरणी करून घ्यावी.
शेतकऱ्यांना जनावरांसाठी पुरेसा चाऱा मिळवण्यासाठी चवळीच्या प्रगत प्रकारच्या वाणाची निवड करणे गरजेचे आहे. त्यामध्ये महाराष्ट्रात मुख्यतः श्वेता, बुंदेल चवळी-2 आणि बुंदेल लोबिया-3 या जातीच्या लागवड केली जाते.
तर वेगवेगळ्या प्रदेशानुसार वेगवेगळ्या वाणांची निवड ही योग्य ठरते. एका हेक्टरमध्ये 40 किलोची लागवड पुरेशी आहे.
तर ज्वारी आणि मकासोबत चवळीची लागवड करायची असेल तर हेक्टरी 20 किलो बियाणांची गरज असते. चवळी पिकाला 8 ते 10 दिवसांतून एकदा पाण्याची गरज असते.
चवळीची खरिपात आणि रब्बी दोन्ही हंगामातही लागवड करता येते. चवळीचा उपयोग जनावरांसाठी चारा म्हणून केल्यास जनावरांच्या दूधात वाढ तर होतेच पण शेतीची सुपीकता वाढून शेतीतील तणांचा नाश देखील होतो.