Agricultural News : दूध उत्पादक शेतकऱ्यांना जनावरांच्या चाऱ्यासाठी उत्तम पर्याय मूरघास वरदान ठरत आहे. एकदल पिकांच्या चाऱ्यामध्ये कर्बोदकांचे प्रमाण जास्त असल्यामुळे मका पिकापासून चांगल्या प्रतिचा मूरघास तयार होतो. अलिकडील काळात चारा अत्यंत महाग झाला आहे. ही समस्या लक्षात घेऊन मूरघास निर्मिती केली जात असल्याने हिरव्या मका पिकाला मागणी वाढली आहे.
गायींची संख्या वाढत असल्याने चाऱ्याची मागणी व त्यावरील खर्च वाढत आहे. दुष्काळी भागात उन्हाळ्यात चाऱ्याचे दर तेजीत असतात. कडब्याचा अपवाद वगळता अन्य चारा साठवून ठेवता येत नाही. बाहेरून चारा आणताना वाहतुकीवरील खर्च वाढतो. गायींना पौष्टिक चारा वर्षभर मिळावा, यासाठी मूरघास चाऱ्याचा पर्याय पुढे आला आहे.
कमी खर्चात शेतकऱ्यांना तीन चार महिन्यांत चांगले आर्थिक उत्पन्न मिळत असल्याने शेतकरी शेतीला जोडधंदा म्हणून दूध उत्पादनाकडे वळले आहेत. वर्षभर जनावरांना चाऱ्याची कमतरता भासू नये, यासाठी चारा साठविण्याची लगबग असते,
मिळेल तेथून हिरवा मक्याचा चारा खरेदी करून त्याचे रुपांतर मुरघासात करून ठेवतात. मका उत्पादक शेतकऱ्यांना तीन चार महिन्यांत या हिरव्या मक्याच्या पिकातून चांगले उत्पन्न मिळते. शेतकऱ्यांकडील हिरवी मका दोन हजार रुपये प्रति टन घेऊन तिची कुट्टी केली जाते,
पॅकींगसाठीचा खर्च सहाशे रुपये, चारा कुट्टी करण्याचा मशीन खर्च नऊशे रुपये, अशा एक टन कुट्टीसाठी पशुपालकांना तीन हजार पाचशे रुपये खर्च येतो. जनावरांची भूक वाढल्याने ते मुरघास जास्त खातात. वाया घालवीत नाहीत.
तो रुचकर, स्वादिष्ट व सौम्य रेचक असतो, वाळलेल्या चाऱ्याच्या तुलनेत मुरघासाची पौष्टिकता उत्तम असते, मुरघासाकरिता चारा पिकाची कापणी फुलोरा अवस्थेत केली जात असल्यामुळे जास्त अन्नद्रव्ये चाऱ्यामध्ये येतात व जनावरांच्या पचनक्रियेत वाढ होते.