Farmer Success Story:- शेतीच्या बाबतीत पाहिले तर सध्या शेतकरी अनेक प्रकारच्या नैसर्गिक आपत्तीमुळे खूप आर्थिक संकटात सापडल्याचे सध्या चित्र आहे. खरीप हंगाम असो की रब्बी हंगाम यामध्ये हातातोंडाशी शेतकऱ्यांचा घास येतो आणि त्याच वेळी नेमका अवकाळी पाऊस किंवा गारपिटीसारखी नैसर्गिक आपत्ती कोसळते व मोठ्या प्रमाणावर शेतकऱ्यांना आर्थिक फटका बसतो. याशिवाय शेतकऱ्यांची परिस्थिती मिळणारा बाजार भाव यामुळे देखील आर्थिक दृष्टिकोनातून खूपच बिकट झाल्याची स्थिती आहे.
शेतीमालाचे उत्पादन किती घ्यावे किंवा किती प्रमाणात पिकवावे हे संपूर्ण शेतकऱ्यांच्या हातात आहे. परंतु त्या शेतीमालाची विक्री करणे मात्र शेतकऱ्यांच्या हातात नसून शेतकऱ्यांनी पिकवलेल्या मालाचे बाजारपेठेतील दर ठरवणारे व्यक्ती दुसरेच असल्यामुळे अत्यल्प भाव मिळाल्याने देखील शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणावर आर्थिक घटका बसतो.

परंतु या सगळ्या परिस्थितीवर मात करण्याच्या उद्देशाने जर आपण लातूर जिल्ह्यातील देवनी तालुक्यातील बोंबली या गावच्या शेतकऱ्यांचा विचार केला तर या शेतकऱ्यांनी देवनी फार्म प्रोडूसर नावाची कंपनी उभारली व एकीचे बळ काय असते किंवा एकत्रपणे कसा विकास साधता येतो हे सिद्ध करून दाखवले.
शेतकऱ्यांनी उभारली कंपनी
याबाबत सविस्तर वृत्त असे की, शेतकऱ्यांना ज्या काही समस्या आहेत त्या समस्यांवर मात करण्याच्या उद्देशाने लातूर जिल्ह्यातील देवणी तालुक्यातील बोंबली या गावच्या तरुण शेतकऱ्यांनी देवणी फार्मा प्रोड्युसर कंपनीची स्थापना केली व या कंपनीच्या माध्यमातून अनेक शेतकऱ्यांचा विकास घडवण्यामध्ये ही कंपनी महत्त्वाची भूमिका पार पाडत आहे.
विशेष म्हणजे या कंपनीची सुरुवात करणारे सर्व व्यक्ती शेतकरी असून या कंपनीच्या माध्यमातून इतर शेतकऱ्यांकडून त्यांनी पिकवलेल्या शेतमाल थेट बांधावर जाऊन खरेदी केला जातो. पुढील हंगामासाठी बियाण्याची निर्मिती करता यावी या उद्देशाने शेतीमालाची खरेदी ही कंपनी करत असते.
या सगळ्या व्यवहारामुळे कंपनीला तर आर्थिक दृष्टिकोनातून फायदा होत आहेच परंतु बाजारपेठेतील दरापेक्षा कंपनीच्या माध्यमातून जास्तीचा दर मिळत असल्याने इतर शेतकऱ्यांना देखील फायदा होत आहे.
देवणी फार्मा प्रोडूसर कंपनी शेतकऱ्यांकडून करते शेतीमालाची थेट खरेदी
या कंपनीच्या माध्यमातून शेतकऱ्यांकडून त्यांनी पिकवलेले तूर, ज्वारी तसेच सोयाबीन व हरभरा तसेच इतर पिकांची खरेदी केली जाते. ही खरेदी थेट शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन होत असल्याने शेतकऱ्यांचा वाहतूक खर्च देखील वाचण्यास मदत होत आहे.
तसेच बाजारपेठेमध्ये दलालांच्या माध्यमातून जो काही खर्च होतो ती रक्कम देखील वाचत असल्याने शेतकऱ्यांना चांगला फायदा होत आहे. सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे बाजारपेठेमध्ये शेतकऱ्यांना जो काही दर मिळतो त्यापेक्षा कंपनी जास्तीचा दर देत असल्याने खूप मोठा फायदा शेतकऱ्यांना या कंपनीच्या माध्यमातून होताना दिसून येत आहे.
कंपनीच्या माध्यमातून जो शेतीमाल खरेदी केला जातो तो कंपनीमध्ये आणून सर्व माल मशीनमध्ये टाकून गुणवत्ता पूर्ण आणि दर्जेदार असा टपोरा माल हा बियाणे निर्मितीसाठी वापरला जातो.
अशाप्रकारे बियाणे निर्माण करताना त्याचा रंग तसेच आकार व बियाण्याची आद्रता या गोष्टींचे प्रामुख्याने तपासणी केली जाते. आमचे सरकारचे जे काही मापदंड आहेत त्यानुसार छाटणी करून या ठिकाणी बियाण्याची निर्मिती होते.
या बियाण्याचा होत आहे शेतकऱ्यांना फायदा व उत्पादनात होत आहे वाढ
देवणी फार्मा प्रोडूसर कंपनीकडून जे बियाणे तयार केले जाते त्याची पेरणी केल्यानंतर शेतकऱ्यांच्या पीक उत्पादनामध्ये 20 टक्के वाढ झाल्याचा अनुभव शेतकऱ्यांना आलेला आहे. म्हणजेच उत्पादनात वाढ तर होतेच आणि शेतीमालाची काढणी केल्यानंतर थेट बांधावरच खरेदी होत असल्यामुळे व बाजारपेठेपेक्षा जास्त दर मिळत असल्याने शेतकऱ्यांना चार पैसे जास्त मिळत आहेत.
जर आपण या कंपनीच्या कामाचे स्वरूप पाहिले तर शेतकऱ्यांकडून जो काही शेतीमाल खरेदी केल्या जातो त्यापासून उच्च गुणवत्तेचे बियाणे तयार केले जाते. याकरिता कंपनीच्या माध्यमातून हरभरा तसेच तूर व ज्वारी व गव्हासारखे धान्याची थेटपणे खरेदी होते व या मालापैकी उच्च दर्जाचा आणि गुणवत्ता असलेला टपोरा माल बाजूला काढला जातो.
त्यातील काही माल हा बिग बाजार तसेच डी मार्ट सारख्या ठिकाणी विक्री देखील केला जातो. म्हणजे या कंपनीच्या माध्यमातून शेतकऱ्यांना दर्जेदार बियाण्याचा पुरवठा तर होतोच.परंतु शहरातील घाऊक बाजारासोबत थेट जोडण्यासाठी देखील शेतकऱ्यांना या कंपनीचा फायदा होताना दिसून येत आहे.
सध्या या कंपनीसोबत जवळपास दोन हजार शेतकरी जोडले गेले आहेत व या शेतकऱ्यांना या कंपनीच्या माध्यमातून तीन कोटींचा फायदा झाला आहे. या कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक बिभीषन भोसले असून त्यांनी सांगितले की पुढील एक वर्षाच्या कालावधीमध्ये आम्हाला कंपनीचे शेअरधारक शेतकऱ्यांची संख्या 5000 पर्यंत वाढवायचे आहे.
शेतकऱ्यांच्या शेतीमालाला बाजारपेठेपेक्षा जास्तीचा दर देऊन त्यांना त्यांच्या कष्टाचा योग्य मोबदला देण्याचा प्रयत्न असल्याचे देखील त्यांनी सांगितले.