Milk Spray On Crop:- पिकांच्या कीड व रोग व्यवस्थापनाच्या दृष्टिकोनातून पिकांवर विविध प्रकारच्या रासायनिक कीटकनाशकांची फवारणी केली जाते. याव्यतिरिक्त अनेक सेंद्रिय कीटकनाशक व जैविक कीटकनाशकांचा देखील वापर केला जातो. तसेच या व्यतिरिक्त बरेच शेतकरी काही जुगाड करून देखील वेगवेगळ्या अशा पदार्थांची फवारणी आपल्याला करताना दिसतात.
परंतु दुधाची फवारणी देखील पिकांवर एखाद्या वनस्पतीवर केली जाते हे जर आपल्याला कोणी सांगितले असेल तर आपल्याला पटणार नाही. परंतु दूध हे जसे मानवी शरीरासाठी आवश्यक आहे तसेच ते वनस्पतींना देखील फायद्याचे असल्याचा दावा केला जातो. झाडांच्या चांगल्या वाढीसाठी खत म्हणून दूध हे काम करत असते.
दुधामध्ये अँटी फंगल आणि कीटकनाशक गुणधर्म देखील आहे त्यामुळे दुधाची फवारणी केल्यावर झाडे निरोगी राहतात. आता आपल्याला माहित आहे की बरेच शेतकरी देशी दारू फवारतात. परंतु अशा गोष्टी फवारण्यापूर्वी कृषी शास्त्रज्ञांचा सल्ला घेणे खूप गरजेचे असते.
मानवी दृष्टिकोनातून जर दुधाचा विचार केला तर दुधामध्ये कॅल्शियम आणि व्हिटॅमिन बी असल्यामुळे मानवाला याचा खूप मोठ्या प्रमाणावर फायदा होतो. याच गुणांचा वनस्पतींना देखील फायदा होतो.
दुधामधील कॅल्शियम वनस्पतींना वाढीसाठी खूप मोठ्या प्रमाणावर मदत करते. तसेच फुलांची सड होण्यापासून देखील प्रतिबंध करते. दुधाच्या बुरशी विरोधी गुणधर्मावर शास्त्रज्ञांनी संशोधन केले असून द्राक्ष पिकात बुरशी विरोधी म्हणून हे काम करते.
वनस्पतींसाठी दुधाचा वापर कसा करावा?
बागेमध्ये फवारणीसाठी ताजे, कालबाह्य आणि पावडर सह कोणत्याही प्रकारचे दूध वापरले जाऊ शकते असे तज्ञांचे म्हणणे आहे. त्यामध्ये कमी मलई किंवा चरबीयुक्त दुधाचा वापर करावा. तसेच दुधामध्ये 50 टक्के पाणी मिसळून फवारणी करावी. जास्त घट्ट दुधाचा वापर करू नये. महत्वाचे म्हणजे नेहमी याकरिता कमी फॅट असलेल्या दुधाची निवड करावी व त्यामध्ये पाणी मिसळून फवारणी करावी.
दुधाचा वापर केल्यानंतर शेतकऱ्यांनी काय करू नये?
दुधाची फवारणी केल्यानंतर झाडांवर रासायनिक कीटकनाशके किंवा खतांचा वापर करू नका असे तज्ञांचे म्हणणे आहे. कारण जर असे केले तर दुधात असलेले बॅक्टेरिया नष्ट होतात व त्यामुळे अपेक्षित परिणाम दिसून येत नाही. झाडांवर दूध फवारल्यानंतर थोडासा नकोसा वास येऊ शकतो. नंतर तो आपोआप कमी होतो.
दुधाचे मिश्रण झाडाच्या पानांवर लावावे व सुमारे 30 मिनिटे ते तपासत राहावे. यामुळे पाणीदार दूध शोषले गेले आहे याची खात्री करता येईल. आपण दुधाचे मिश्रण थेट रोपाच्या मुळाजवळ देखील टाकू शकतात व त्यामुळे मुळाना ते शोषता येऊ शकते. टोमॅटो सारख्या काही झाडांच्या पानांवर जर जास्त काळ हे द्रावण राहिले तर बुरशीजन्य रोग होण्याचा धोका संभवतो. त्यामुळे तज्ञाचा सल्ला घेऊनच दुधाची फवारणी करावी.