ढोरजळगाव परिसरात चालूवर्षी मे महिन्यात अवकाळी पाऊस झाल्याने यंदा पावसाचे प्रमाण चांगले राहील, या आशेने काही शेतकऱ्यांनी अवकाळी पावसावर तर काही शेतकऱ्यांनी मान्सूनच्या पावसावर कपाशी, तूर, मूग, सोयाबीनची पेरणी केली खरी ; परंतु गेल्या महिनाभरापासून पावसाने पाठ फिरवल्यामुळे शेतकरी मोठ्या आडचणीत सापडला असून, त्याच्यापुढे दुबार पेरणीचे संकट उभे राहिले आहे.
भारत हा कृषिप्रधान देश म्हणून सर्वत्र ओळख आहे. याठिकाणची बहुतांश शेती कोरडवाहू असल्याने नैऋत्य मोसमी पावसावरच आवलंबून असते. गेल्यावर्षी प्रमाणे यावर्षीदेखील पावसाचे प्रमाण चांगले राहील,

या आशेने मे महिन्यात मोठ्या प्रमाणात आलेल्या अवकाळी पावसावर काही शेतकऱ्यांनी बियाणे खरेदी करून लागवड व पेरणी केली, त्यानंतर दहा ते बारा दिवसांच्या कालावधी दरम्यान शेतीच्या मशागतीची कामे पूर्ण झाल्याने आणि जूनमध्ये मान्सूनचा पाऊस पडल्याने उर्वरित शेतकऱ्यांनी पेरणी केली. सगळीकडे आनंदी आनंद असताना पावसाने गेल्या महिनाभरापासून दडी मारल्याने उगवून आलेल्या कपाशी पिकाची अवस्था कडक पडणाऱ्या उन्हामुळे बिकट झाली आहे.
ही परिस्थिती काही दिवस अशीच राहिली तर शेतकऱ्यांपुढे दुबार पेरणीचे संकट उभे राहणार आहे. नुकत्याच झालेल्या पेरणीला कर्ज घेतल्याने आता पुन्हा कर्ज कोण देणार, या चिंतेने शेतकरी गर्भगळित झाला आहे. येत्या काही दिवसांत पाऊस न पडल्यास शेतीवर अवलंबून असलेल्या कुटुंबांच्या उदरनिर्वाहाचा प्रश्न निर्माण होणार आहे. त्यामुळे शासनाने वेळीच पेरणीसाठी मदत किंवा बी-बियाणे वाटपाची ठोस पाउले उचलणे गरजेचे असल्याचे ढोरजळगाव परिसरातील शेतकरी वर्गातून बोलले जात आहे.
‘दोन वेळा ट्रॅक्टर,
बी-बियाणे, खते यावर खर्च केला. आता जर पुन्हा पेरणी करावी लागली तर आर्थिकदृष्ट्या परवडणार नाही.’ दुबार पेरणी केल्यास उत्पन्नाचे गणित पूर्णपणे कोलमडण्याची भीती आहे.
शेतकरी चिंताग्रस्त
गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा मान्सून चांगला राहील, या हवामान विभागाच्या खात्याने दिलेल्या अंदाजानुसार शेतकऱ्यांनी मोठ्या आशेने कपाशी, तूर, सोयाबीन, मका यांसारख्या पिकांच्या पेरण्या पूर्ण केल्या; परंतु सततचा कोरडा कालावधी आणि वाढत्या उन्हामुळे उगवलेली बियाणे सुकून चालली आहेत. पिकांचा हरवलेला उगम पाहून शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावर चिंता दिसत आहे.