Ahilyanagar News: जामखेड- पंतप्रधान कृषी सिंचन योजनेंतर्गत ‘प्रति थेंब अधिक पीक’ या उद्देशाने जामखेड तालुक्यातील शेतकऱ्यांनी ठिबक आणि तुषार सिंचन यंत्रणा बसवली. मात्र, २०२३-२४ या वर्षातील ५६३ शेतकऱ्यांचे ८१ लाख ३८ हजार रुपयांचे ठिबक सिंचन अनुदान गेल्या दोन वर्षांपासून रखडले आहे. अनुदानाची वाट पाहत शेतकरी हवालदिल झाले असून, आर्थिक अडचणींना सामोरे जावे लागत आहे.
केंद्र आणि राज्य सरकारच्या पंतप्रधान कृषी सिंचन योजनेंतर्गत शेतकऱ्यांना पाण्याचा काटकसरीने वापर करता यावा, यासाठी ८० टक्के अनुदानावर ठिबक आणि तुषार सिंचन संच उपलब्ध करून दिले जातात. यात केंद्र सरकार ५५ टक्के आणि राज्य सरकार २५ टक्के अनुदान देते. हे अनुदान शेतकऱ्यांच्या बँक खात्यात थेट जमा होते. पण गेल्या दोन वर्षांपासून हे अनुदान मिळणे बंद झाले आहे, ज्यामुळे शेतकऱ्यांची आर्थिक कोंडी झाली आहे.

दोन वर्षापासून अनुदानच नाही
अनेक शेतकऱ्यांनी स्वतःच्या खिशातून पैसे खर्च करून किंवा बँकेतून कर्ज काढून ठिबक यंत्रणा बसवली. सरकारकडून लवकर अनुदान मिळेल, या आशेने त्यांनी हा खर्च उचलला. पण दोन वर्षे उलटूनही अनुदानाची रक्कम खात्यात जमा न झाल्याने त्यांचे आर्थिक नियोजन कोलमडले आहे. काही शेतकरी कर्जाच्या ओझ्याखाली दबले असून, बँकेच्या हप्त्यांची परतफेड करणे त्यांना अवघड झाले आहे.
अनुदान कधी मिळणार, याची माहिती घेण्यासाठी शेतकरी तालुका कृषी कार्यालयात खेटे घालत आहेत. पण तिथेही ठोस उत्तरे मिळत नाहीत. “शासनाकडून निधी आलेला नाही, अनुदान कधी मिळेल हे सांगता येणार नाही,” अशी उत्तरे मिळत असल्याने शेतकऱ्यांमध्ये तीव्र नाराजी पसरली आहे. ‘महाडीबीटी’ पोर्टलद्वारे शेतकऱ्यांची लॉटरी पद्धतीने निवड होते, त्यानंतर खरेदी प्रक्रिया पूर्ण करून अनुदान जमा केले जाते. पण निधीच उपलब्ध नसल्याने ही प्रक्रिया रखडली आहे.
शेतकऱ्यांना आर्थिक संकट
या रखडलेल्या अनुदानामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होत आहे. कर्ज काढून ठिबक बसवणाऱ्या शेतकऱ्यांना आर्थिक संकटाला सामोरे जावे लागत आहे. सरकारच्या या ढिसाळ कारभारामुळे शेतकऱ्यांमध्ये असंतोष वाढत आहे. अनुदानाची रक्कम लवकरात लवकर जमा व्हावी, अशी मागणी शेतकरी करत आहेत.
निधी लवकरच जमा होणार
जामखेड तालुक्यातील तालुका कृषी अधिकारी रवींद्र घुले यांनी सांगितले की, पंतप्रधान कृषी सिंचन योजनेंतर्गत ठिबक आणि तुषार सिंचनाचे अनुदान केंद्र आणि राज्य सरकारकडून मिळते. सध्या ५६३ शेतकऱ्यांचे ८१ लाख ३८ हजारांचे अनुदान रखडले आहे. याबाबत वरिष्ठ स्तरावर सातत्याने पाठपुरावा सुरू आहे. निधी मिळाल्यावर शेतकऱ्यांच्या आधार-लिंक खात्यावर रक्कम तात्काळ जमा होईल.
शेतकऱ्यांची नाराजी
नान्नज येथील शेतकरी हनुमंत मोहळकर यांनी आपली व्यथा मांडताना सांगितले, “दोन वर्षांपूर्वी ठिबक यंत्रणा बसवली. अनुदानाची अपेक्षा होती, पण अजूनही काहीच मिळाले नाही. बँकेतून कर्ज घेतले, त्याचे हप्ते फेडणे कठीण झाले आहे. कृषी कार्यालयात किती वेळा गेलो, तरी स्पष्ट उत्तर मिळत नाही. सरकार फक्त जाहिराती करते, प्रत्यक्षात शेतकऱ्यांना काहीच मदत मिळत नाही.”