Namo Drone Didi Yojana:- महिलांना व्यावसायिक दृष्टिकोनातून प्रोत्साहन मिळावे याकरिता शासनाच्या अनेक योजना असून या योजनाच्या माध्यमातून महिलांना व्यवसाय उभारणी करता कर्ज मिळते व अशा व्यवसायाच्या माध्यमातून महिला आर्थिक दृष्ट्या स्वावलंबी होतील हा सरकारचा उद्देश आहे.
यामध्ये जर आपण कृषी क्षेत्राचा विचार केला तर कृषी क्षेत्रामध्ये मोठ्या प्रमाणावर यंत्रिकीकरण होऊ लागले आहे आणि छोट्या मोठ्या कामांकरिता आता अनेक यंत्रे विकसित झाल्यामुळे कृषी क्षेत्राला याचा खूप मोठा फायदा झालेला आहे. जर आपण कृषी क्षेत्रामधील पिकांची फवारणी पाहिली तर फवारणी करिता मोठ्या प्रमाणावर वेळ आणि पैसा खर्च होतो.
त्यामुळे आता ड्रोनद्वारे फवारणी संकल्पना पुढे येऊ लागल्याने सरकारच्या माध्यमातून शेती क्षेत्रामध्ये ड्रोन वापरायला प्रोत्साहन केले जात आहे व याचाच भाग म्हणून महिलांशी संबंधित असलेली ड्रोन दीदी योजना ही खूप महत्त्वाची ठरणार आहे. या योजनेची सुरुवात 2022 मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केली
व या अंतर्गत येणाऱ्या पाच वर्षांमध्ये जवळपास एक लाख महिलांना ड्रोन चालवण्याचे प्रशिक्षण दिले जाणार आहे. ही योजना देशभरातील कृषी विज्ञान केंद्राच्या माध्यमातून राबविण्यात येत असून यामुळे आता ग्रामीण भागातील महिला देखील ड्रोन उडवू शकणार आहेत.
कसे आहे ड्रोन दीदी योजनेचे स्वरूप?
ही एक भारत सरकारची योजना असून योजना 2022 मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदींनी सुरू केलेली होती. महिलांचे सक्षमीकरण व्हावे आणि कृषी क्षेत्राची उत्पादकता वाढावी या उद्दिष्टाने योजना सुरू करण्यात आलेली आहे. यावर्षीच्या अंतरिम बजेटमध्ये केंद्र सरकारने नमो ड्रोन दिदी योजनेकरिता 500 कोटी रुपयांची तरतूद केली आहे.
येणाऱ्या पाच वर्षांमध्ये या योजनेअंतर्गत एक लाख महिलांना ड्रोन चालवण्याचे ट्रेनिंग दिले जाणार आहे महत्त्वाचे म्हणजे ही योजना कृषी विज्ञान केंद्राच्या माध्यमातून राबविण्यात येत आहे. या योजनेच्या माध्यमातून महिलांना ड्रोन उडवणे तसेच डेटाचे विश्लेषण आणि ड्रोनचे देखभाल इत्यादी बाबतचे महत्त्वपूर्ण प्रशिक्षण दिले जाणार आहे.
तसेच या अंतर्गत विविध कृषी ऑपरेशनचा देखील प्रशिक्षणामध्ये समावेश करण्यात आलेला आहे. त्या माध्यमातून पिकांचे निरीक्षण तसेच कीटकनाशके आणि खतांची फवारणी व बियाण्याची पेरणी इत्यादींचा समावेश करण्यात आला आहे. या योजनेमुळे कृषी क्षेत्राची उत्पादकता वाढेल आणि कार्यक्षमता देखील सुधारेल ही अपेक्षा सरकारला आहे.
शेतीवरील खर्च कमी करण्याच्या दृष्टिकोनातून देखील ही योजना महत्वपूर्ण आहे. रोजगाराच्या संधी देखील वाढतील. ड्रोन दीदी योजना ही भारत सरकारची महत्वकांक्षी योजना असून ड्रोन दीदी योजना 2024 मध्ये महिला ड्रोन पायलटला प्रत्येक महिन्याला पंधरा हजार रुपये पगार देण्याची यामध्ये तरतूद करण्यात आलेली आहे.