दिवाळीतही कमी भावामुळे झेंडू उत्पादक शेतकरी चिंतेत

Ahmednagarlive24
Updated:

दसऱ्याप्रमाणे यंदा दिवाळीत देखील फुल उत्पादक शेतकरी कमी भावामुळे चिंतेत आहे. दुष्काळजन्य परिस्थितीमुळे व्यापारी व पुष्पहार ओवणी करणारे दुकानदांकडे मागणी नसल्यामुळे व महत्वाचे म्हणजे प्लास्टिक फुलांच्या माळा व तोरण बाजारात मोठ्या प्रमाणात उपलब्ध असल्यामुळे नैसर्गिक फुलांना समाधानकारक भाव नसल्याचे शेतकरी सांगतात.

यंदा पावसाचे प्रमाण कमी राहिल्यामुळे श्रीरामपूर तालुक्यातील प्रवरेसह गोदावरी नदी परिसरासह वाकडी (ता. राहाता) शिवारातील अनेक शेतकऱ्यांनी कमी पाण्यावर परवडणारी फुल शेती निवडली आहे.

झेंडूची सुरुवातीची तोडणी साधारणपणे दसऱ्याच्या मुहूर्तावर केली जाते. परंतु यंदा दसऱ्यात झेंडूला कमी भाव मिळाल्याने शेतकऱ्यांची चांगलीच निराशा झाली. त्यामुळेच शेतकऱ्यांची सारी आशा आजच्या दिवाळी सणावर आहे.

यंदा पावसाचे प्रमाण अत्यंत कमी आहे. त्यामुळे रब्बीची आशा मोठ्या प्रमाणात धूसर होत चालली आहे. असे असताना यंदा मोठ्या प्रमाणात झेंडू फुल शेतीचा मार्ग शेतकऱ्यांनी निवडला आहे.

दरवर्षी नवरात्र, दसरा, दिवाळी या अनुषंगाने फुल उत्पादकांनी झेंडू लावला. दररोज झेंडूच्या विक्री मध्ये शेतकऱ्यांना २० ते ३० रुपये प्रतिकिलोपर्यंतचे दर दसऱ्यापर्यंत मिळाले.

शेतकऱ्यांनी दसऱ्यानिमित्त झेंडू फुले शिर्डी, राहाता, श्रीरामपूर, राहुरी आदी शहरांमध्ये विक्रीला नेली जातात. आदल्या दिवशी ४० ते ५० रुपये प्रति किलोने विकला गेलेला झेंडू दसऱ्याच्या दिवशी २० पाच ते ३० रुपये प्रतिकिलोपर्यंत खाली घसरला.

त्यामुळे राहुरी भागात अनेकांनी फुलाचा ढीग तसाच रस्त्यावर सोडलयाने दसरा त्यांच्यासाठी नुकसानीचा ठरला. आता सगळ्यात मोठा सण आज दिवाळी आहे. या सणासाठी शेतकऱ्यांनी फुले तोडणी करून शहरांकडे पाठवला आहे.

शेतकऱ्यांनी फुल शेतीसाठी खूप मेहनत घेतली असून चार वेळा कीडनाशक फवारणी केली आहे. त्यात पुन्हा वन्यप्राणी उपद्रव करत असल्याने शेतकरी दिवसरात्र शेतातच होता. तोडणीसाठी मजूर मिळत नसल्यामुळे अधिकची मजुरी देऊन फुल तोडणी करावी लागली आहे. त्यामुळे दिवाळीला तरी लक्ष्मी पावेल, अशी आशा शेतकऱ्यांना लागली आहे.

नुकसान भरून निघावे
झेंडू फुलांना सध्या ३० ते ४० रुपये प्रति किलोचा दर मिळत आहे. दीपावलीच्या मुहूर्तावर यात १० ते २० रुपये वाढ झाल्यास मागील नुकसान भरून काढण्यासाठी मदत होईल. – बबनराव आहेर, फूल उत्पादक शेतकरी, वाकडी.

बाजारभाव
झेंडू मोठा ३० ते ४० रुपये किलो
झेंडू मध्यम २० ते ३० रुपये किलो
गुलाब १०० ते १५० रुपये शेकडा
अस्टर ७० ते ८० रुपये किलो
शेवंती ८० ते १०० रुपये किलो

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe