Farmer Success Story : राज्यातील शेतकरी बांधव आपल्या वेगवेगळ्या प्रयोगाच्या माध्यमातून कायमच चर्चेत राहत असतात. असाच एक प्रयोग सध्या नाशिक जिल्ह्यात पाहायला मिळत आहे. खरं पाहता नाशिक जिल्ह्यातील इगतपुरी तालुका हा भात उत्पादनासाठी संपूर्ण महाराष्ट्रात ओळखला जातो.
याच तालुक्यातील पिंपळगाव घाडगा या ठिकाणी एका प्रयोगशील शेतकऱ्याने चक्क मल्चिंग पेपरवर भात लागवडीचा प्रयोग यशस्वी करून दाखवला आहे. देविदास पोपट देवगिरे असे या प्रयोगशील शेतकऱ्याचे नाव. देविदास यांनी मल्चिंग पेपरवर भात लागवड करत ठिबक सिंचन प्रणालीचा वापर करून यशस्वी उत्पादन घेतले आहे. यामुळे सध्या त्यांची पंचक्रोशीत चांगलीचं चर्चा रंगली आहे.

खरं पाहता देविदास यांनी केलेला हा प्रयोग उत्पादनाच्या बाबतीत अजून तरी फारसा असा सकारात्मक पाहायला मिळाला नाही मात्र व्यवस्थापनाच्या दृष्टीने आणि उत्पादन खर्चाच्या दृष्टीने हा प्रयोग फायदेशीर असल्याचे त्यांनी नमूद केले आहे. उत्पादनात देखील वाढ झाली असती मात्र भात लागवड उशिरा झाली यामुळे कदाचित उत्पादनात अपेक्षित अशी वाढ झाली नाही असं त्यांनी नमूद केलं आहे.
पारंपारिक पद्धतीने भात रोवणी करण्याऐवजी नवीन आधुनिक पद्धतीने भात रोवणी करावी या अनुषंगाने त्यांनी 25 मायक्रोन जाडीच्या मल्चिंग पेपरवर ऑगस्ट महिन्यातील दुसऱ्या पंधरवाड्याच्या सुरुवातीला भाताची लागवड केली. या प्रयोगशील शेतकऱ्याने पट्टा पद्धतीने दोन ओळींची लागवड केली त्यातील दोन ओळींतील अंतर हे ४० सेमी इतके ठेवण्यात आले असल्याचे त्यांनी सांगितले.
तसेच भात रोपांतील अंतर हे देखील २० सेमी ठेवले. ठिबक सिंचन प्रणालीचा वापर केला असून नळ्यामधील अंतर हे साडेचार फूट त्यांनी ठेवले. देविदास यांनी केलेल्या या प्रयोगामुळे त्यांना व्यवस्थापनात काही फायदे दिसून आलेत. शिवाय यामुळे उत्पादन खर्चात बचत झाली आहे.
पारंपारिक पद्धतीने भात रोवणी करताना चिखलनी करावी लागते, या आधुनिक पद्धतीने रोवणी केल्यास मात्र हा खर्च वाचतो. बियाणे देखील कमी लागते. खत कमी लागते तसेच पिकाच्या वाढीच्या अवस्थेत योग्य पद्धतीने खत व्यवस्थापन आणि पाणी व्यवस्थापन केले जाऊ शकते. मल्चिंग पेपरचा वापर केला असल्यामुळे तणाचा प्रादुर्भाव कमी होतो.
साहजिकच यामुळे मजुरीवर होणारा खर्च देखील वाचतो. एकंदरीत विचार केला तर सध्या स्थितीला त्यांना उत्पादनात फारसा असा डिफरन्स पाहायला मिळाला नसला तरी देखील उत्पादन खर्चात बचत झाल्यामुळे उत्पन्नात भर पडली असावी.