Farmer Success Story : मराठवाडा म्हटलं की डोळ्यासमोर उभे राहतं ते भीषण दुष्काळाचे चित्र. बीड जिल्हा देखील दुष्काळग्रस्त जिल्हा म्हणून कुख्यात बनला आहे. मात्र, कुख्यात जिल्ह्यात असेही अनेक प्रयोगशील शेतकरी आहेत जे आपल्या नाविन्यपूर्ण प्रयोगाच्या माध्यमातून विख्यात बनले आहेत.
जिल्ह्यातील धारूर तालुक्यातील मौजे थापा येथील एका तरुण शेतकऱ्याने देखील असाच एक भन्नाट प्रयोग शेतीमध्ये केला आहे. रवी वाघचौरे असे या प्रयोगशील तरुण शेतकऱ्याचे नाव असून त्यांनी आपल्या दोन एकर शेतजमीनीत पपई आणि टरबूज या दोन पिकातून केवळ दोन एकरातून तीन लाखांची कमाई करून दाखवली आहे. यामुळे सध्या रवी दादांची पंचक्रोशीत चांगलीचं चर्चा रंगली आहे.

रवी यांनी दिलेल्या माहितीनुसार, त्यांनी मे महिन्यात ताईवान ७८६ या पपईच्या जातीची आपल्या एक एकर शेत जमिनीत लागवड केली. शिरसाळा येथून मयंक गांधी संस्थेतून पपईची रोप मागवली, रोप लागवड केल्यानंतर पीक व्यवस्थापन ते काढणीपर्यंत त्यांना एकरी 90 हजाराचा खर्च आला.
मे महिन्यात लागवड केलेल्या पपईच्या पिकातून त्यांना ऑक्टोबर पासून प्रत्यक्ष उत्पादन मिळण्यास सुरुवात झाली. दोन ते अडीच किलो वजनाची पपई त्यांना मिळाली असून याला 22 रुपये असा प्रति किलोचा दर मिळाला आहे. आतापर्यंत यातून त्यांना दोन लाखांची कमाई झाली आहे.
दरम्यान ऑक्टोबर महिन्याच्या सुरुवातीला त्यांनी टरबूज या हंगामी पिकाची आपल्या एक एकर शेत जमिनीत लागवड केली. हे पीक अल्प कालावधीत काढण्यासाठी तयार होत असल्याने त्यांनी या पिकाची निवड केली होती. हे पिक 60 दिवसात तयार झालं असून या पिकाला लागवडीपासून ते काढणीपर्यंत 50 हजाराचा खर्चं आला आहे.
टरबूज चे पाच ते सहा किलो वजनाचे फळ मिळाले आहे. टरबूजला दहा रुपये प्रति किलो असा दर मिळाला अन यातून त्यांना एक लाखांची कमाई झाली आहे. खरं पाहता रवी आधी कापूस, सोयाबीन यांसारख्या पारंपारिक पिकांची शेती करत असत. निसर्गाच्या लहरीपणामुळे या पारंपारिक पिकाच्या शेतीतून त्यांना अतिशय कमी उत्पादन मिळत असत. शिवाय बाजारात कायमच दरात चढ-उतार राहत असे.
परिणामी त्यांनी आपल्या एका मित्राच्या सल्ल्याने पारंपारिक शेतीला बगल देत बागायती तसेच हंगामी पिकांच्या शेतीकडे आपला मोर्चा वळवला. मग काय त्यांनी पपई आणि टरबूज या पिकांची लागवड केली. आजच्या घडीला त्यांना यातून लाखो रुपयांची कमाई झाली असून ते समाधान व्यक्त करत आहेत.
रवी यांनी इतर प्रयोगशील शेतकऱ्यांना पारंपारिक पिकपद्धतीला बगल देत नवीन नगदी पिकांची शेती करण्याचा सल्ला दिला आहे. निश्चितच रवी यांचा हा प्रयोग इतरांसाठी मार्गदर्शक ठरणार यात तीळ मात्र देखील शंका नाही.