Farmer Success Story: खानदेशातील ‘हे’ शेतकरी बंधू 35 वर्षांपासून घेतात भरीत वांग्याचे उत्पादन! मिळवतात एकरमध्ये 1 लाख रुपये आर्थिक उत्पन्न

Published on -

Farmer Success Story:- महाराष्ट्रातील शेतकरी अनेक प्रकारच्या वेगवेगळ्या पिकांचे उत्पादन घेतात. यामध्ये प्रामुख्याने आता शेतकरी भाजीपाला पिकांचे उत्पादन आणि फळबागा लागवड यांना मोठ्या प्रमाणावर पसंती देताना दिसून येत आहेत. शेतीमध्ये वेगवेगळ्या प्रकारचे तंत्रज्ञान आणि पिकपद्धती आल्यामुळे शेती आता मोठ्या प्रमाणावर व्यावसायिक दृष्टिकोनातून केली जात आहे.

तसेच पिकांच्या बाबतीत महाराष्ट्रात जिल्हा नुसार विविधता आपल्याला दिसून येते. उदाहरणच घ्यायचे झाले तर नाशिक जिल्हा हा प्रामुख्याने द्राक्ष, डाळिंब आणि कांदे या पिकासाठी प्रसिद्ध आहे तर खानदेशातील जळगाव जिल्हा हा प्रामुख्याने केळी उत्पादक जिल्हा किंवा केळीचा आगार म्हणून ओळखला जातो.

परंतु याच केळीच्या आगार असलेल्या जळगाव जिल्ह्यामधील ज्ञानेश्वर आणि धनराज राणे  या शेतकरी बंधूंच्या कुटुंबाने गेल्या 35 वर्षापासून भरीत वांग्यांच्या पिकामध्ये सातत्य ठेवलेले असून त्या माध्यमातून आर्थिक प्रगती केलेली आहे. याच राणे बंधूंची यशोगाथा आपण या लेखात बघणार आहोत.

 भरीत वांग्यांच्या उत्पादनातून एकरी एक लाख रुपये उत्पन्न

याबाबत सविस्तर वृत्त असे की, जळगाव जिल्ह्यातील भुसावळ तालुक्यात असलेल्या पिंपळगाव येथील रहिवासी असलेले ज्ञानेश्वर आणि धनराज राणे हे बंधू उपलब्ध पाण्यामध्ये भाजीपाला पिकाचे नियोजन करतात व भाजीपाला उत्पादनात त्यांनी खूप मोठे नाव कमावले आहे. त्यांच्याकडे एकूण 40 एकर शेती आहे व दोनही भावांनी या 40 एकर शेतीचे नियोजन वाटून घेतलेले आहे.

एवढ्या मोठ्या क्षेत्रामध्ये पाण्याची उपलब्धता व्हावी याकरिता तीन कुपनलिका आणि विहिरी असून तरी देखील उन्हाळ्यामध्ये पाण्याचे संकट निर्माण होते. त्यामुळे ते या दृष्टिकोनातून पिकाचे नियोजन करतात.राणे कुटुंबाचा विचार केला तर गेल्या 35 वर्षांपेक्षा जास्त कालावधीपासून म्हणजेच त्यांचे वडील व आजोबांच्या कालावधीपासून भरताचे वांगे उत्पादन हे कुटुंब घेत आहे.

दरवर्षी मे ते जून महिन्याचा पहिला आठवडा आणि जून व जुलै अशा तीन टप्प्यांमध्ये ते भरताची वांग्याची लागवड करतात. विशेष म्हणजे या वांग्याचे बियाणे देखील ते घरीच तयार करतात. याकरिता पिवळी झालेली वांगी तोडतात व त्या वांग्यातून बिया काढल्या जातात

व पत्र्याच्या डब्यामध्ये त्या साठवल्या जातात व पुढे याच बियांचा वापर वांग्याची रोपवाटिका तयार करण्यासाठी केला जातो. हे बियाण्याचे वांगे गोलाकार व लांबट अशा दोन आकाराचे असून गेल्या कित्येक वर्षापासून त्यांनी हे बियाणे जतन केले आहे. संपूर्ण क्षेत्रामधून ते अडीच एकर क्षेत्रावर भरताच्या वांग्याचे लागवड करतात.

 राणे बंधूंना किती मिळते वांग्याचे उत्पादन?

भरताच्या वांग्यांचा विचार केला तर लागवडीनंतर साधारणपणे अडीच महिन्यांनी त्यांची काढणी सुरू होते व पुढे तीन ते चार महिन्यांपर्यंत त्यांचे उत्पादन मिळते. एका तोड्याला साधारणपणे 50 पन्नी वांग्याचे उत्पादन मिळते व एका पन्नीमध्ये 20 किलो वांगे मावते. एका हंगामामध्ये 12 ते 13 वांग्याच्या तोडण्या होतात. या तोडलेल्या वांग्याची प्रतवारी केली जाते व प्लास्टिक पिशव्यांमधून त्याची पॅकिंग होते. हिवाळ्याच्या कालावधीमध्ये या वांग्यांना खूप चांगल्या प्रकारे मागणी असते.

 विक्रीचे नियोजन कसे आहे?

हिवाळ्याच्या कालावधीमध्ये अनेक ठिकाणी वांग्याच्या भरीतला पसंती दिली जाते व अनेक व्यावसायिकांकडून देखील वांग्यांना मोठी मागणी असते. तसेच परिसरातील अनेक नागरिक हे त्यांच्या शहरांमध्ये राहणाऱ्या नातेवाईकांना वांगे पाठवण्यासाठी देखील राणे बंधूंच्या भरताच्या वांग्यांना पसंती देतात.

सुरुवातीला या वांग्यांना तीस ते पस्तीस रुपये प्रतिकिलो इतका दर मिळतो व डिसेंबर मध्ये जेव्हा आवक वाढते तेव्हा 25 रुपये पर्यंत भाव स्थिर राहतात. जानेवारी महिन्याच्या कालावधीमध्ये दर थोडे कमी होतात. परंतु तरी देखील एका एकर मधून एक लाख रुपयांचे उत्पन्न मिळते असे देखील राणे यांनी सांगितले.

तसेच आपण जळगाव जिल्ह्यातील यावल व रावेर या ठिकाणच्या आठवडी बाजारांचा विचार केला तर भरताच्या वांग्यांसाठी हे ठिकाणे प्रसिद्ध आहेत. त्यामुळे त्या ठिकाणचे किरकोळ विक्रेते व मोठ्या व्यापाऱ्यांकडून देखील या वांग्यांना मागणी असते. तसेच जळगाव शहरांमध्ये देखील शंभर पेक्षा जास्त भरीत वांगी सेंटर आहेत व त्या ठिकाणी दररोज 100 क्विंटल पर्यंत वांग्याची मागणी असते.

या ठिकाणचे व्यावसायिक शेतकऱ्यांकडून थेट वांग्याची खरेदी करतात. याशिवाय पुणे,मुंबई आणि नाशिक सारख्या ठिकाणी देखील भरीत सेंटर सुरू झाले असल्यामुळे भरीतच्या वांग्यांना आता मोठी मागणी असते.

अशा पद्धतीने राणे बंधूंनी भरीत वांग्यांच्या उत्पादनामध्ये सातत्य ठेवले असून त्या माध्यमातून चांगले नियोजन व व्यवस्थापन ठेवून ते चांगले पैसे मिळवत आहेत.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Latest News

Stay updated!