Farmer Success Story:- शेती म्हटले म्हणजे निसर्गावर अवलंबून असणारा बेभरवशाचा व्यवसाय ही फार पूर्वपार चालत आलेली समज किंवा मत असून ते तितकेच खरे देखील आहे. आपण बऱ्याचदा पाहतो की ऐन पीक काढण्याची वेळ येते व तेव्हाच नैसर्गिक आपत्ती म्हणजेच अवकाळी पाऊस किंवा अतिवृष्टी, गारपीटीची समस्या उद्भवते व हातात येणारे पीक वाया जाते. या नैसर्गिक आपत्तीमध्ये शेतकऱ्याचे कष्ट आणि पैसा देखील वाहून जातो.
परंतु अशा वारंवार येणाऱ्या नैसर्गिक आपत्तीच्या संकटांमधून देखील शेतकरी पुन्हा उभे राहतात व तेवढ्याच कष्टाने पुन्हा कामाला लागतात. परंतु आता तंत्रज्ञानाचा वापर आणि हवामान बदलामुळे शेती पद्धतीत करण्यात आलेले बदल यामुळे शेतकरी बऱ्याच प्रमाणामध्ये आता शेती व्यवसाय यशस्वी करताना दिसून येत आहेत.

पीक पद्धतीतील बदलाचा विचार केला तर आता परंपरागत पिकांची लागवड शेतकरी पार विसरून गेले असून आताची तरुण पिढी शेतीमध्ये येत असताना फळबाग लागवडीकडे आणि तंत्रज्ञानाचा जोरावर भाजीपाला लागवड इत्यादी कडे मोठ्या प्रमाणावर वळले आहेत. व्यवस्थापन आणि तंत्रज्ञानाचा वापर आणि कष्ट या जोरावर फळबाग लागवडीतून अनेक शेतकरी शेती व्यवसायातून लाखो रुपयांचे उत्पन्न मिळवताना दिसून येत आहेत.
अगदी याच मुद्द्याला धरून जर आपण बाबुळगाव येथील दीपक गुरगुडे या तरुण शेतकऱ्याचा विचार केला तर या शेतकऱ्याने पाच एकर डाळिंब शेतीच्या माध्यमातून डाळिंबाचे 71 टनांपेक्षा जास्त उत्पादन घेत एक कोटी पेक्षा जास्त आर्थिक उत्पन्न मिळवले आहे. याच अनुषंगाने या शेतकऱ्याची यशोगाथा आपण बघणार आहोत.
डाळिंब शेतीतून या शेतकऱ्याने मिळवला कोटीत नफा
याबाबतचे सविस्तर वृत्त असे की, बाबुळगाव येथील दीपक गुरगुडे या तरुण शेतकऱ्याने गेल्या पाच ते सात वर्षांपासून घरच्या पाच एकर शेतामध्ये डाळिंबाची लागवड केली असून सलग उत्पादन या माध्यमातून ते घेत आहेत. बऱ्याचदा प्रतिकूल वातावरण असताना देखील त्यांनी स्वतःचे ज्ञान आणि कष्ट या जोरावर डाळिंब शेतीमध्ये यश मिळवले आहे. दीपक हे संपूर्णपणे इस्रायल पद्धतीने डाळिंबाची शेती करत असून सघन पद्धतीने त्यांनी लागवड केली आहे.
पाच एकरामध्ये एकूण 3400 डाळिंबाची झाडांची लागवड त्यांनी केली असून या डाळिंबावर कीटकनाशकांच्या फवारणी करिता त्यांनी स्प्रेयिंग मशीनचा वापर केलेला आहे. शेतीकडे त्यांनी एक व्यवसाय म्हणून लक्ष केंद्रित केले असून सलग चार वर्ष डाळिंबाचे उत्कृष्ट आणि यशस्वी उत्पादन घेतल्यामुळे दौंड येथे आयोजित करण्यात आलेला दौंड कृषी महोत्सव 2023 मध्ये त्यांना कृषीभूषण सन्मान देऊन देखील सन्मानित करण्यात आले आहे.
जर आपण इंदापूर तालुक्याचा विचार केला तर गेल्या दोन ते तीन वर्षांपासून वातावरणात झालेल्या बदलामुळे या ठिकाणच्या शेतीचे खूप मोठे नुकसान झालेले आहे व त्यातच यावर्षी पाऊस खूप कमी झाला त्याचा देखील फटका शेतीला बसलेला आहे. परंतु विपरीत अशा या नैसर्गिक परिस्थितीमध्ये न डगमगता दीपक यांनी उत्तम प्रकारचे डाळिंबाचे पीक घेतले आहे.
एवढेच नाही तर मागील चार वर्षापासून त्यांची डाळिंबाची निर्यात ही बांगलादेश आणि दुबई या ठिकाणी होत असून देशांतर्गत मार्केटमध्ये ते दिल्लीपर्यंत पोहोचले आहेत. दीपक गुरगुडे यांनी आधुनिक शेती तंत्रज्ञानाचा आधार घेत निर्यातक्षम डाळिंबाचे उत्पादन घेतले असून त्यांनी पाच एकर डाळिंब शेतीतून 71 टन दोनशे किलो इतके डाळिंबाचे उत्पादन मिळवले आहे व या माध्यमातून त्यांना एक कोटी 23 लाख रुपयांचे आर्थिक उत्पन्न मिळाले आहे.
डाळिंब शेतीबद्दल दीपक काय म्हणतात?
डाळिंब हे उष्णकटिबंधातील कमी पाण्यावर येणारे पीक असून या पिकासाठी पाण्याची गरज ओळखून त्या पद्धतीने नियोजन केले तर शेतकऱ्यांना दुष्काळात देखील तारून नेणारे हे पीक आहे असे त्यांचे म्हणणे आहे. या पिकाला ठिबक सिंचन पद्धतीने जर पाण्याचे व्यवस्थापन केले तर ते योग्य ठरते व डाळिंबाच्या सेटिंग कालावधीमध्ये या पिकासाठी पाण्याची योग्य नियोजन करणे महत्त्वाचे आहे असे देखील त्यांनी म्हटले आहे.