Farmer Success Story: हा शेतकरी सव्वा दोन एकरमध्ये केलेल्या जांभूळ लागवडीतून वर्षाला घेतो 13 लाखापर्यंत उत्पन्न! अशा प्रकारचे आहे विक्री नियोजन

Ajay Patil
Published:
farmer success story

Farmer Success Story:- कुठलाही व्यवसाय म्हटला म्हणजे त्यामध्ये थोडीशी कल्पकता आणि तुमच्या व्यवसायाची मार्केटिंग जर उत्तम प्रकारचे राहिले तर तुम्ही छोट्याशा व्यवसायातून देखील खूप चांगल्या पद्धतीने पैसा मिळवू शकतात. हाच मुद्दा शेती क्षेत्राला देखील लागू होतो. शेतकऱ्यांनी जर बाजारातील मागणीनुसार उत्पादन घेण्याचे निश्चित केले तर नक्कीच या माध्यमातून शेतकरी लाखो रुपये कमवू शकतात.

आता या प्रकारचा प्रयत्न अनेक शेतकरी करताना आपल्याला दिसून येत आहे. पारंपारिक पिके आता काळाच्या ओघात मागे पडले असून शेतकरी आता विविध प्रकारची फळबागा तसेच शेडनेट सारख्या तंत्रज्ञानाचा वापर करून वेगवेगळ्या प्रकारची भाजीपाला पिकांचे उत्पादन घेण्यामध्ये आता माहीर झाल्याचे चित्र आपल्याला दिसून येत आहे व या माध्यमातून कमीत कमी क्षेत्रात देखील शेतकरी लाखो रुपये मिळवत आहेत.

याच मुद्द्याला धरून जर आपण पिल्लनवाडी या दौंड तालुक्यातील गावाचे रहिवाशी असलेले दिनेश भुजबळ या शेतकऱ्याचे उदाहरण घेतले तर ते वरील मुद्द्याला साजेशे असेच आहे. डाळिंबाचे उत्पादन घेणाऱ्या भुजबळ यांनी 2014 मध्ये डाळिंब बाग काढली व त्या ठिकाणी जांभूळ लागवडीचा निर्णय घेतला व हाच निर्णय त्यांना आज वर्षाला 13 लाखापर्यंत उलाढाल करण्यास मदत करत आहे.

 दिनेश भुजबळ यांचा जांभूळ लागवडीचा निर्णय ठरला फायद्याचा

दौंड तालुक्यातील पिल्लनवाडी येथील शेतकरी दिनेश भुजबळ यांनी 2014 मध्ये सव्वादोन एकरामध्ये 225 जांभळाची झाडे लावली व आता या बागेला दहा वर्षांचा कालावधी लोटला आहे. लागवडीपासून साधारणपणे पाचव्या वर्षी त्यांनी लावलेल्या जांभळाला फळे यायला सुरुवात झाली व सुरुवातीपासून त्यांनी उत्तम पद्धतीने विक्री नियोजन केले.

परंतु मध्यंतरीच्या कालावधीमध्ये संपूर्ण देशामध्ये कोरोनाचे सावट पसरले व याचा फटका भुजबळ यांना बसायला सुरुवात झाली व उत्पादित केलेल्या जांभळाची विक्री करणे मात्र जिकिरीचे बनले.

परंतु त्यांनी यामधून मार्ग काढत थेट ग्राहकांना विक्री करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला व हाच निर्णय त्यांना फायद्याचा ठरला. या माध्यमातून ग्राहकांसाठी घरपोच जांभळे पुरवण्याची त्यांची ही पद्धत आजपर्यंत देखील सुरू असून ग्राहकांच्या माध्यमातून देखील त्यांच्या जांभळाला विशेष मागणी आपल्याला दिसून येते.

 जांभळाच्या विक्रीकरिता केला सोशल मीडियाचा वापर

साधारणपणे 2020 या वर्षापर्यंत त्यांनी लागवड केलेल्या जांभळाचे उत्पादन सुरू झाले होते.परंतु कोरोना कालावधीत लागलेल्या लॉकडाऊन मुळे त्यांना थेट विक्री करता आली नाही व त्यावर मार्ग काढत त्यांनी फेसबुकचा वापर उत्तम पद्धतीने केला व फेसबुकच्या माध्यमातून ऑनलाईन पद्धतीने ग्राहक जोडले व उत्पादित केलेल्या जांभळांची विक्री सुरू केली.

आज ते जवळपास 80 टक्के उत्पादित झालेल्या जांभळांची विक्री थेट ऑनलाईन पद्धतीने ग्राहकांना करतात. त्यांचे विशेष म्हणजे जांभळाचे काढणी झाल्यानंतर अवघ्या दोन तासांमध्ये फ्रेश असे जांभूळ ग्राहकांपर्यंत पोहोचवण्यासाठी ते प्रयत्न करतात. त्यामुळे ग्राहकांच्या माध्यमातून देखील किमतीचा विचार न करता जांभूळ त्यांच्याकडून खरेदी केली जाते.

 भुजबळ यांनी तयार केला जांभळांचा विशेष ब्रँड

भुजबळ यांच्या शेतात पिकलेले जांभळा विषयी ग्राहकांमध्ये प्रचंड प्रमाणात विश्वासाचे नाते तयार झाले आहे व त्या विश्वासाला तडा न जाऊ देण्यासाठी भुजबळ यांनी गणेश गार्डन भुजबळ फार्म या नावाने बॉक्स पॅकिंग करायला सुरुवात केली व याच नावाचा ब्रँड देखील त्यांनी विकसित केला.

याच ब्रँडच्या माध्यमातून ते उत्तम क्वालिटीचे जांभूळ ग्राहकांना पुरवतात. जर आपण भुजबळ यांना मिळणारे उत्पन्न पाहिले तर सव्वादोन एकर मध्ये लागवड केलेल्या 225 झाडांपैकी शंभर झाडांना दरवर्षी जांभूळ लगडतात.

बाकीच्या झाडांना त्याच्या पुढच्या वर्षी उत्पादन मिळते व सरासरी मात्र कमी निघते. एका वर्षाला साधारणपणे एका झाडापासून  50 किलोपर्यंत जांभळाचे उत्पादन मिळते व यातून ते वर्षाला 12 ते 13 लाखांची वार्षिक उलाढाल करतात.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe