Farmer Success Story:- आजकालचे उच्चशिक्षित तरुण मोठ्या प्रमाणावर स्पर्धा परीक्षांची तयारी करताना दिसून येतात. स्पर्धा परीक्षा उत्तीर्ण होणे म्हणजे प्रत्येकालाच शक्य होते असे नाही. काही विद्यार्थी बरेच कष्ट करून देखील अपयशी ठरतात. परंतु अपयशामुळे खचून न जाता वेगळा काहीतरी मार्ग धरून त्यासाठी कष्ट करण्याची तयारी ठेवून यशस्वी होण्याची जिद्द काहीजण बाळगतात.
यामध्ये जिद्द आणि कष्टाच्या जोरावर खूप मोठ्या प्रमाणावर यश संपादन करतात. जर आपण शेतीचा विचार केला तर या क्षेत्रामध्ये आता अनेक उच्च शिक्षित तरुण करिअरच्या दृष्टिकोनातून पाहू लागले असून शेतीला एक व्यावसायिक स्वरूप आणण्यासाठी खूप प्रमाणात तरुणांची मदत होत आहे.

शेतीमध्ये आलेले वेगवेगळ्या प्रकारच्या तंत्रज्ञानाचा वापर आणि फळबाग लागवड या माध्यमातून तरुण आता शेतीमधून देखील खूप चांगल्या पद्धतीचे उत्पन्न मिळवत आहेत. याच मुद्द्याला धरून जर आपण नांदेड जिल्ह्यातील भोशी या गावच्या नंदकुमार गायकवाड या उच्चशिक्षित तरुणाची यशोगाथा पाहिली तर या तरुणाने देखील स्पर्धा परीक्षांचा नाद सोडून शेती करण्याचा निर्णय घेतला आणि यशस्वी देखील झाला. याच तरुण शेतकऱ्याची आपण यशोगाथा या लेखात बघणार आहोत.
पेरू लागवडीतून मिळवले तेरा लाखांचे आर्थिक उत्पन्न
याबाबत सविस्तर वृत्त असे की, नांदेड जिल्ह्यातील भोसी या गावातील उच्चशिक्षित तरुण नंदकिशोर गायकवाड याने बीए पर्यंत शिक्षण घेतले व पुणे या ठिकाणी जाऊन स्पर्धा परीक्षांची तयारी जोरात सुरू केली. परंतु कष्ट करून देखील स्पर्धा परीक्षेमध्ये त्याला यश आले नाही.
परंतु या अपयशामुळे खचून न जाता कोरोना कालावधीमध्ये तो गावी परत आला. गावी आल्यानंतर मात्र त्यांनी शेती करण्याचा निर्णय घेतला. स्वतःच्या दहा एकर माळरान जमिनीवर त्याने फळबाग लागवडीचे निश्चित केले व त्या दिशेने काम सुरू केले. साहजिकच कोणी काहीतरी नवीन काम करत असेल तर अपेक्षा प्रमाणे समाज काहीतरी टोमणे मारतोच व असाच काहीतरी प्रकार नंदकिशोर याच्यासोबत देखील घडला. परंतु कोणाकडे लक्ष न देता जिद्द आणि मेहनतीच्या जोरावर त्याने फळबाग लागवडीचा प्रयोग यशस्वी करून दाखवला.
50 पेक्षा जास्त फळझाडांची केली लागवड
नंदकिशोर गायकवाड यांनी त्याच्या शेतीमध्ये चिकू, काजू तसेच जांभूळ, डाळिंब, आंबा आणि पेरू, सिताफळ, रामफळ तसेच सफरचंद व अंजीर इत्यादी जवळपास 50 पेक्षा अधिक फळझाडांची लागवड केली आहे. यामध्ये प्रामुख्याने 3000 पेरूची झाडे तसेच १००० आंबा व पाचशे काजूची तर लिंबूचे 1000 झाडे त्याने लावली असून मागच्या वर्षी पेरूच्या उत्पादनातून त्याला 13 लाख रुपयांचे उत्पन्न मिळाले. परंतु विशेष म्हणजे यावर्षी वीस लाखांपेक्षा जास्त उत्पादन पेरूतून मिळेल अशी अपेक्षा नंदकिशोर ला आहे. एवढेच नाही तर इतर फळबागेपासून मिळणारे आर्थिक उत्पन्न देखील लाखो रुपयांच्या घरात आहे.
यावरून आपल्याला दिसून येते की एखाद्या क्षेत्रामध्ये जर आपल्याला अपयश आले तर खचून जातात दुसऱ्या एखाद्या क्षेत्रामध्ये कष्ट करून मोठे होता येते हे नंदकिशोर गायकवाड यांच्या उदाहरणावरून दिसून येते.













