शेतकऱ्यांनो तुरीची लागवड केलीय, भरघोस उत्पादन घेण्यासाठी आणि रोग नियत्रंणासाठी ही खास माहिती नक्की वाचा!

Published on -

खरीप हंगामात गेल्या काही वर्षात जिल्ह्यात तुरीच्या लागवड क्षेत्रात कमालीची वाढ झाली आहे. मागील तीन वर्षात प्रक्विंटल भावही आठ ते दहा हजार रूपयांच्या आसपास राहत आहे. शेतकरीही अधिकाधिक उत्पादन मिळविण्यासाठी वेगवेगळे प्रयोग करीत आहेत. तसेच आधुनिक तंत्रज्ञानामुळे हार्वेस्टिंगचाही प्रश्न मार्गी लागला आहे. त्यामुळेही शेतकऱ्यांचा कल तुरीकडे वाढल्याचे दिसते. यामुळे तुरीचे रोगराईपासून संरक्षण कसे करावे, खत, पाणी व्यवस्थापन आदी विषयीची माहिती.

खत व्यवस्थापन

सलग तुरीसाठी हेक्टरी २५ किलो नत्र व ५० किलो स्फुरद म्हणजेच १२५ किलो डीएपी पेरणीचे वेळी द्यावे. पीक ५०% फुलोऱ्यात असतांना मल्टीन्यूट्रीयन्टची फवारणी करावी. पाणी व्यवस्थापन तूर हे खरीप हंगामामधील पीक असल्यामुळे ते पावसावर वाढते. तथापि पावसामध्ये खंड पडल्यास किंवा पाण्याचा ताण पडल्यास आणि सिंचनाची सुविधा असल्यास पिकास वाढीच्या अवस्थेमध्ये (३० ते ३५ दिवस), फुलोऱ्याच्या अवस्थेमध्ये (६० ते ७० दिवस) आणि शेंगा भरावयाच्या अवस्थेमध्ये पाणी द्यावे. अथवा ठिबक सिंचनाने ५०% वाष्पीभवनानंतर एक दिवसाआड पाणी द्यावे. त्यामुळे पीक उत्पादनात अधिक वाढ होते.

आंतर मशागत

पेरणीनंतर १५ ते २० दिवसांनी पहिली कोळपणी करावी, पुढे १५ दिवसांनी खुरपणी किंवा कोळपणी करावी. अधिक उत्पादनासाठी पीक पेरणीनंतर ३०-४५ दिवस शेत तणविरहीत ठेवावे, तणनियंत्रणासाठी तणनाशकाचा चापर करावयाचा असल्यास पेरणीनंतर लगेच वापशावर (पुरेसा ओलावा) पेंडीमेथीलीन (स्टॉम्प प्लस) हे तणनाशक २.५ लिटर प्रति हेक्टरला ५०० लिटर पाण्यातून फवारावे तर पेरणीनंतर १५ ते २० दिवसांनी इमॅझामॉक्स इमॅझेथेपर ७० डब्ल्यू.जी. या तणनाशकाची २ ग्रॅम प्रति १० लिटर पाण्यातून फवारणी करावी, तसेच अधिक उत्पादनासाठी पेरणीनंतर ४५ दिवसांनी झाडाचा वरून ५ सें. मी. तुरीचा शेंडाखुडण्याची क्रिया एकदाच करावी.

वांझ रोग

तूर पिकामध्ये वांझ या विषाणूजन्य रोगाचा प्रार्दुभाव आढळून येतो. या रोगामुळे पिकास फुले व शेंगा लागत नाहीत त्यामुळे लागवडीसाठी वांझ रोग प्रतिकारक्षम वाणांची निवड करावी. झाडावर रोगाची लक्षणे दिसू लागताच रोगग्रस्त झाडे उपटून त्यांचा नायनाट करावा. या रोगाचा प्रसार कोळी या किटकामार्फत होतो त्यामुळे प्रसार थांबविण्यासाठी योग्य कोळीनाशक औषधाची फवारणी करावी.
फायटोप्थोरा करपा हा देखील तुरीचा महत्त्वाचा रोग आहे. पिकात पाणी साठून राहिल्यास या रोगाचा प्रार्दुभाव झपाट्याने वाढतो व खोड आणि फांट्या करपतात. या रोगाच्या व्यवस्थापनासाठी पीक लागवडीकरता पाण्याचा उत्तम निचरा होणारी जमीन निवडावी तसेच जास्त पाऊस झाल्यास पिकात पाणी साठून राहणार नाही याची काळजी घ्यावी.

रोगराईपासून संरक्षण कसे कराल?

तुरीमध्ये फुलोरा व शेंगा भरण्याच्या अवस्थेमध्ये शेंगा पोखरणारी अळी (घाटेअळी), मरूका, पिसारी पतंग व शेंग माशी या किडींचा प्रादुर्भाव वाढतो. या किडींमुळे ३० ते ४० टक्के नुकसान होते. या किडींच्या नियंत्रणासाठी एकात्मिक कीड व्यवस्थापन वा पद्धतीचा वापर करावा. शेंगा पोखरणाऱ्या अळींचा प्रादुर्भाव कळण्यासाठी व किडींच्या नियंत्रणासाठी पाच कामगंध सापळे/हेक्टरी लावावेत. शेतात पक्ष्यांना बसण्यासाठी मचाण म्हणजेच इंग्रजी टी आकाराचे पक्षी थांबे ५०-६० प्रती हेक्टर उभारावेत. पिकास फुलकळी येताना प्रतिबंधात्मक उपाय म्हणून ५ टक्के निंबोळी अर्काची किंवा निंबोळीयुक्त किटकनाशक अॅझाडिरेक्टीन ०.०३टक्के (३०० पी.पी.एम.) ५ मि.ली. प्रती लिटर पाणी या प्रमाणात पहिली फवारणी करावी.

तुरीला पन्नास टक्के फुलोरा आल्यानंतर एच.ए.एन.पी.व्ही. ५०० एल.ई. (हेलिओकिल) १.० मि.ली. प्रती लिटर पाण्यातून फवारणी करावी. एच.ए.एन.पी.व्ही. या विषाणूंची कार्यक्षमता अतिनील किरणात टिकून राहण्यासाठी अर्ध्या लिटर पाण्यात १ ग्रॅम रानीपॉल पावडर टाकून हे द्रावण १ मि.ली. प्रती लिटर द्रावणात मिसळून फवारणी केल्यास प्रथम व द्वितीय अवस्थेतील अळ्यांचे प्रभावी नियंत्रण मिळते. यानंतर शेंगा भरण्याच्या अवस्थेत जर किडींनी आर्थिक नुकसानकारक पातळी ओलांडली असेल तर इंडोक्झाकार्ब १४.५ टक्के एस. सी. प्रवाही ०.७ मि.ली. किंवा इमामेक्टीन बेंझोएट ५ टक्के एस.जी. ०.३ मि.ली. प्रती लिटर पाणी या प्रमाणात फवारणी करावी.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Latest News

Stay updated!