राहाता- राहाता तालुक्यामध्ये सोयाबीन पिकाची विस्तृत क्षेत्रावर पेरणी झाली असून सध्या या पिकामध्ये मोठ्या प्रमाणावर हुमणी अळीचा प्रादुर्भाव आढळून येत आहे. कृषी विज्ञान केंद्र बाभळेश्वर आणि तालुका कृषी अधिकारी राहाता यांच्यावतीने तालुक्यातील दुर्गापूर, हासनापूर, रामपूरवाडी, एलमवाडी, नपावाडी या गावांमध्ये सोयाबीन प्लॉटला भेटी दिल्या असता सोयाबीनच्या पिकाची मुळे कुरतडून खाल्ल्यामुळे पीक वाळून जात असल्याचे तालुका कृषी अधिकारी आबासाहेब भोरे यांनी सांगितले.
या वर्षी मे महिन्यामध्येच मोठ्या प्रमाणावर पाऊस झाल्यामुळे हुमणीचे भुंगेरे जमिनीतून बाहेर पडले. त्यांनी जमिनीत अंडी टाकल्यामुळे त्यातून जन्मलेल्या अळ्यांचा सोयाबीन, ऊस, भुईमूग, बाजरी या पिकांमध्ये मोठ्या प्रमाणावर प्रादुर्भाव झाल्याचे कृषी विज्ञान केंद्र बाभळेश्वरचे पीक संरक्षण विभागाचे भरत दवंगे यांनी सांगितले. या अळ्यांची भुंगे प्रकाश सापळ्याद्वारे पकडून नष्ट करणे गरजेचे असते, ज्यामुळे जमिनीमध्ये अंडी घातली जात नाहीत आणि अळ्या जन्माला येत नाहीत.

मात्र भुंगे गोळा करून नष्ट न केल्यामुळे हुमणी अळीचा प्रादूर्भाव मोठ्या प्रमाणावर वाढला आहे. त्यातच पावसाने सुद्धा उघडीप दिली आहे आणि जमिनी कोरड्या झाल्या आहेत. हलक्या आणि पाण्याचा निचरा लवकर होणाऱ्या जमिनीमध्ये हुमणी अळीचा प्रादुर्भाव जास्त दिसत आहे.
सद्य परिस्थितीमध्ये या हुमणी अळीचे नियंत्रण करण्यासाठी ०.३% फिप्रोनील हे किटनाशक प्रति एकरी १० किलो या प्रमाणात एखाद्या रासायनिक खतात मिसळून जमिनीत टाकावे असे श्री. दवंगे यांनी सांगितले. सदर किटकनाशक जमिनीत टाकल्यावर ते पाण्यासोबत जमिनीत जाणे आवश्यक असल्याने पिकाला वरून स्प्रिंकलरने पाणी देणे आवश्यक आहे.
ज्या शेतकऱ्यांना फ्लोने पाणी देणे शक्य असेल अशा शेतकऱ्यांनी इमिडॅक्लो प्रिड ४०% अधिक फिप्रोनील ४०% हे संयुक्त किटकनाशक प्रति एकरी १५० ग्राम २०० लिटर पाण्यात मिसळून पाणी देताना पिकामध्ये सोडावे, असे आवाहन कृषी विज्ञान केंद्र बाभळेश्वर आणि तालुका कृषी अधिकारी राहाता यांच्यावतीने करण्यात आले आहे.