अहिल्यानगर : जिल्ह्यातील दक्षिण भाग हा दुष्काळी पट्टा म्हणून ओळखला जातो. येथील शेतीला शाश्वत पाण्याचा स्त्रोत उपलब्ध नसल्याने शेती संपूर्णतः निसर्गाच्या भरवशावर अवलंबून आहे. निसर्गाच्या लहरीपणाचा नेहमीच शेतकऱ्यांना फटका बसत असतो. अपवादात्मक स्थिती वगळता शेती व्यवसाय तोट्यातच जात असल्याचे चित्र तालुक्यात पहावयास मिळते. यावर पर्याय म्हणून आधुनिकतेची कास धरतअनेक तरुण शेतकरी शेतीत नवनवीन प्रयोग करत आहेत.
अहिल्यानगर तालुक्यातील दुष्काळी भागातील जेऊर येथील तरुण शेतकऱ्याने सफरचंदाची यशस्वी लागवड केली आहे. झाडांनी फळधारणा देखील केली आहे त्यामुळे आगामी काळात अहिल्यानगरच्या नागरिकांना काश्मिरी सफरचंदाची गोड चव चाखायला मिळणार आहे.

अहिल्यानगर तालुक्यातील शेतकरी नेहमीच दुष्काळ व निसर्गाच्या लहरीपणाचा फटका सहन करत असतो. मुबलक प्रमाणात पाणी उपलब्ध नसल्याने शेती व्यवसायावर मर्यादा येतात. पाण्याचे योग्य नियोजन करून शेती व्यवसाय करावा लागतो. शेतीला जोड व्यवसाय म्हणून दुग्ध व्यवसाय ही तालुक्यात मोठ्या प्रमाणात होत आहे. परंतु निसर्गाच्या अवकृपेमुळे येथील शेती व्यवसाय बहुतांशी वेळा तोट्यात जात आहे.
जेऊर येथील युवा शेतकरी अमोल काळे यांनी सफरचंद लागवडीचा प्रयोग आपल्या शेतात राबविला आहे. त्यासाठी उष्ण हवामानात येणाऱ्या सफरचंदाच्या रोपांची निवड करण्यात आली. डॉर्सेट गोल्डन, ॲना, हर्मन ९९ या तीन जातींच्या रोपांची बारा बाय पंधरा अंतरावर लागवड करण्यात आली आहे. सफरचंदाची रोपे हिमाचल प्रदेश मधील विलासपूर येथून आणण्यात आली आहेत. अल्पभूधारक असलेल्या अमोल काळे यांनी सफरचंदाच्या उत्पन्नाविषयी संपूर्ण माहिती घेऊन अभ्यास करत लागवड केली आहे.
सुमारे दोन वर्षांपूर्वी लागवड केलेल्या रोपांनी फळधारणा देखील केली होती. रोपांना मावा वगळता इतर कोणत्याही रोगांचा प्रादुर्भाव जाणवत नसल्याचे काळे यांनी सांगितले. मुरमाड व पाण्याचा निचरा होणारी जमीन सफरचंद लागवडीसाठी पोषक असते. लावलेल्या रोपांना साधारणपणे तीन वर्षांनी पूर्णपणे फळधारणा होते. तीन वर्ष झालेल्या झाडाला सरासरी २०किलो पर्यंत फळांची धारणा होत असल्याची माहिती अमोल काळे यांनी दिली. रोपांच्या वाढीसाठी गांडूळ खतांचा वापर करण्यात येत आहे.
या सफरचंदाच्या जातींसाठी पाणी देखील जास्त लागत नसल्याने दुष्काळी पट्ट्यात सफरचंद लागवडीचा प्रयोग निश्चितपणे यशस्वी ठरणार आहे. काळे यांनी शंभर झाडांची लागवड केलेली असून झाडांना दीड वर्षातच सफरचंदाची फळे लगडल्याचे पहावयास मिळाले. सफरचंद लागवड केलेल्या क्षेत्रात आंतरपीक देखील घेतले जात आहे. दुष्काळी कोरडवाहू पट्ट्यात सफरचंद लागवडीचा प्रयोग यशस्वी झाल्यास शेतकऱ्यांसमोर नवीन पर्याय उपलब्ध होणार आहे. उष्ण हवामानातील देशी सफरचंद म्हणून ॲना, डॉर्सेट गोल्डन या जाती ओळखल्या जातात.