चार दिवस लिलाव बंद राहिल्यानंतर गुरुवारी लिलाव सुरू झाले खरे, परंतु कांद्याला कमी दर मिळत असल्याचा आरोप करत संतप्त झालेल्या शेतकऱ्यांनी ठिकठिकाणचे लिलाव बंद पाडले. नाफेडने मंगळवारी कांदा खरेदीस प्रारंभ केला असला तरी गुरुवारी नाफेड प्रत्यक्षात लिलावात उतरले नाही.
त्यामुळे नाफेडने लिलावात उतरून कांदा खरेदी करावा, या मागणीसाठी पिंपळगाव बसवंत, येवला, चांदवड येथील लिलाव बंद पाडत शेतकऱ्यांनी आंदोलन केले. त्यात चांदवड येथील आंदोलन चिघळल्याने पोलिसांनी धरपकड करत बळाचा वापर केला. यावेळी रस्त्यावर झोपून आंदोलन करणाऱ्या काही आंदोलकांना ताब्यात घेण्यात आले.
केंद्र सरकारने कांदा निर्यातशुल्कात ४० टक्के वाढ केल्याने व्यापाऱ्यांनी बंद पाळत त्यास विरोध केला. बुधवारी केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री भारती पवार यांनी मध्यस्थी केल्यानंतर गुरुवारपासून लिलाव प्रक्रिया सुरू झाली.
सकाळ सत्रात अनेक ठिकाणी कांद्याला प्रतिक्विंटल सतराशे ते दोन हजार रुपये दर मिळाल्याने शेतकऱ्यांनी लिलाव बंद पाडले. नाफेडकडून दोन हजार ४१० रुपये प्रतिक्विंटल दराने कांदा खरेदी केला जात असताना लिलावात कमी दर मिळत असल्याचा आरोप शेतकऱ्यांनी केला.
कांद्याला किमान चार हजार रुपये दर मिळावा, या मागणीसाठी चांदवड येथील मुंबई-आग्रा महामार्गावरील पेट्रोल पंप चौफुलीवर चांदवड व देवळा तालुक्यांतील शेतकऱ्यांनी दोन तास महामार्ग रोखून धरला. त्यामुळे वाहतूक ठप्प होऊन वाहनांच्या पाच किलोमीटरहून अधिक लांब रांगा लागल्या.
पोलिसांनी समजूत काढूनही शेतकरी आंदोलनावर ठाम असल्याने पोलिसांनी बळाचा वापर केला, त्यामुळे आंदोलन चिघळले. तहसीलदार मंदार कुलकर्णी यांनी आंदोलकांशी चर्चा करून मार्ग काढण्याचा प्रयत्न केला.
मात्र, जोपर्यंत नाफेडचे अधिकारी आंदोलनस्थळी येऊन शेतकऱ्यांना आश्वस्त करत नाहीत, तोपर्यंत आंदोलन सुरूच ठेवण्याचा निर्णय शेतकऱ्यांनी घेतल्याने आंदोलन सुमारे दोन-तीन तास लांबले.
केंद्र व राज्य सरकार फसव्या घोषणा करत आहे. नाफेडमार्फत कांदा खरेदीचे आश्वासन दिले; मात्र प्रत्यक्षात नाफेडने यंत्रणा अद्याप उभी केलेली नाही. त्यामुळे शेतकऱ्यांच्या मालाला कमी दर मिळत आहे. सर्वसामान्यांना त्रास होऊ नये म्हणून आंदोलन थांबवले असून, सोमवारपर्यंत यंत्रणा सुरळीत न झाल्यास पुन्हा आंदोलन करण्यात येईल.
कांदा खरेदीसाठी केंद्रे वाढवा – मुख्यमंत्री
नाफेडने कांदा खरेदीसाठी सध्या १३ केंद्रे सुरू केली आहेत. मात्र शेतकऱ्यांकडील उपलब्ध कांदा खरेदीसाठी केंद्र सरकारने महाराष्ट्रात वाढीव खरेदी केंद्रे सुरू करावीत, अशी मागणी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केंद्र सरकारकडे केली आहे. राज्यात कांदा खरेदी प्रश्नांवर तोडगा काढण्यासाठी मुख्यमंत्री शिंदे यांनी केंद्र सरकारला पत्र पाठवले