Ahmednagar News : शेवगाव तालुक्यातील शहरटाकळी, दहिगाव-ने भागातील मागील वर्षी झालेल्या अतिवृष्टीमध्ये नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना अद्यापही अनुदान मिळाले नसल्यामुळे शेतकरी शेवगाव तहसील कार्यालयाचे उंबरठे झिजवत असून,
ऑनलाईन प्रक्रियेचा शेतकऱ्यांच्या डोक्याला ताप झाल्याचे चित्र आहे. विशेष म्हणजे ई-केवायसी करूनही अनेकांच्या खात्यावर अतिवृष्टीची रक्कम आली नसल्याचे शेतकऱ्यांनी सांगितले.
अतिवृष्टीच्या अनुदानाची यादी तयार करताना झालेल्या चुकांमुळे बळीराजा अनुदानापासून वंचित असल्याने शेतकऱ्यांत नाराजी असून, यावर्षी पुन्हा पावसाचे प्रमाण कमी असल्याने खरिपातील पिके जवळपास वाया गेल्याचे चित्र आहे. त्यात मागील वर्षीचे अनुदान मिळत नसल्याने शेतकरी हताश झाला आहे.
बँक खात्यावर अनुदान जमा झाले नसल्यामुळे शेतकरी आधार कार्ड घेऊन सेतू कार्यालय, पोस्ट ऑफिस, तलाठी कार्यालय, तहसील कार्यालयात चकरा मारत आहे. मात्र योग्य उत्तर न मिळाल्याने या ऑनलाइन प्रक्रियेच्या शेतकऱ्यांच्या डोक्याला ताप झाला आहे.
अनुदानाची यादी तयार करताना शेतकऱ्यांनी बँकेच्या खात्यासह आधार कार्ड तलाठी कार्यालयात दिले होते. परंतु यादी तयार करताना झालेल्या चुकांमुळे लाभार्थी अनुदानापासून वंचित आहे.
अनुदान आले की नाही याची चौकशी करण्यासाठी शेतकऱ्यांना शेवगाव तहसीलदारांकडे दोन ते चार दिवसानंतर चक्कर मारावी लागत असल्याने आर्थिक भुर्दंड सहन करावा लागत आहे. त्यामुळे शासनाने अनुदानाची यादी सविस्तर घेऊन अनुदान थेट शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा करावे अशी मागणी होत आहे.
मागील वर्षाच्या अतिवृष्टीच्या पावसात शेवगाव तालुक्यातील शहरटाकळी, दहिगाव-ने परिसरात शेतकऱ्यांची मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते. त्यामुळे शासनाने अनुदान घोषित केले. काही शेतकऱ्यांच्या बँक खात्यात अनुदान जमा झाले. मात्र अजूनही अनेक शेतकरी या अनुदानापासून वंचित आहे.