Tur Farming : गतवर्षी तूर पिकाची जोमदार व समाधानकारक वाढ झाली आहे. तुर पिकांमध्ये पाण्याचा ताण सहन करण्याची क्षमता आहे. पावसाचा मोठा खंड पडला होता. तथापी सात आणि आठ सप्टेंबर मध्ये पाऊस झाल्यानंतर तुर पिकाची जोमदार वाढ झाली आहे.
तुरीमध्ये फुलोरा व शेंगा भरण्याच्या अवस्थेमध्ये शेंगा पोखरणारी अळी येण्याची शक्यता असल्यामुळे शेतकऱ्यांनी चांगली काळजी घ्यावी, असे आवाहन कृषी शास्त्रज्ञ डॉ. अशोकराव ढगे यांनी केले.

तालुक्यातील रांजणगाव देवी येथे काल गुरुवारी राष्ट्रीय अन्नसुरक्षा अभियान अंतर्गत पीक पाहणी अंतर्गत झालेल्या कार्यशाळेत तुर पिकावरील शेती शाळा पार पडली. याप्रसंगी मार्गदर्शन करताना कृषी शास्त्रज्ञ डॉ. अशोकराव ढगे म्हणाले की,
फुलोऱ्याच्या अवस्थेमध्ये शक्य असल्यास 60 ते 70 दिवसाच्या दरम्यान पाणी द्यावे. शेंगा पोखरणाऱ्या अळीचा बंदोबस्त करण्यासाठी पिकास फुलकळी येताना प्रतिबंधक उपाय म्हणून पाच टक्के निंबोळी अर्काची फवारणी करावी.
किडीमुळे तुरीचे तीस ते चाळीस टक्के नुकसान होत असते, जर कीड जास्त प्रमाणात असेल तर तातडीने इमामेक्टीन बेंजोएट पाच टक्के तीन मिली दहा लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.
ही काळजी घेतल्यास गतवर्षी तुरीचे उत्पादन चांगले मिळेल. त्याचबरोबर इतर पिकाशी तुलना करता तुरीला भाव सुद्धा योग्य व रास्त मिळण्याची शक्यता आहे. त्यामुळे शेतकरी बंधूंनी काळजी घ्यावी, असे आवाहन त्यांनी केले. तूर शेती शाळा कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी पत्रकार अशोकराव पंडित होते.
शेती शाळेच्या चर्चा सत्रामध्ये शेतकरी सचिन कुम्हे, गणेश गवळी, निलेश शिंदे, सचिन पंडित, रवींद्र चौधरी, संतोष शिंदे, पांडुरंग पेहेरे, गणेश चौधरी, सखाराम ज्ञानेश्वर शिंदे, मच्छिद्र पेहेरे, मोहन पेहेरे, दावीत जावळे, गंगाधर गव्हाण,
शिवाजी वाघ, वसंत चौधरी, गोरख पेहेरे या शेतकऱ्यांनी सहभाग घेतला. महाराष्ट्र शासनाचे कृषी विभागातील विविध योजनांची माहिती कृषी सहाय्यक राजेंद्र गायकवाड यांनी आभार मानले. याप्रसंगी शिवार फेरीचे सुद्धा आयोजन केले होते.