अहिल्यानगर : शेतकऱ्यांवर आसमानी संकट कोसळले आहे. पावसाने दडी मारल्याने खरीप हंगाम धोक्यात आला असून कांद्याचे भाव गडगडल्याने कांदा उत्पादक शेतकऱ्यांची दयनीय अवस्था झाली आहे. कांद्याची वखारी मध्ये साठवणूक करावी तर कांदा खराब होतोय विकावा तर भावाअभावी झालेला खर्च देखील वसूल होत नाही अशा दुहेरी संकटात शेतकरी सापडला आहे. बळीराजावर सर्वच बाजूंनी संकटाचे ढग दाटलेअसून खरीप पिकांबाबत ही शाश्वती नसल्याने चिंतेचे वातावरण तयार झाले आहे.
अहिल्यानगर जिल्ह्यातील अनेक शेतकऱ्यांसाठी कांदा हे महत्त्वाचे पीक ठरत आहे. कांदा पिकाच्या उत्पादनावरच मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांचे वार्षिक गणित अवलंबून असते. कांदा उत्पादनासाठी अग्रेसर म्हणून अहिल्यानगर तालुका ओळखला जातो. लाल कांदा, रांगडा कांदा तसेच गावरान कांद्याचे उत्पादन मोठ्या प्रमाणात होत असते. सद्यस्थितीत कांद्याचे बाजार भाव गडगडले असल्याने शेतकरी वर्गामध्ये चिंता निर्माण झाली आहे. आजच्या बाजारभावानुसार शेतकऱ्यांचा उत्पादन खर्च देखील वसूल होणार नाही अशी परिस्थिती आहे.

रब्बी हंगामात गावरान कांदा पिकाचे उत्पादन मोठ्या प्रमाणात घेण्यात आले होते. कांद्याचे पठार म्हणून ओळखल्या जाणाऱ्या जेऊर पट्ट्यात पाण्याअभावी कांद्याच्या उत्पादनात घट झाली. परंतु तालुक्यात इतर सर्व भागात गावरान कांद्याचे विक्रमी उत्पादन घेण्यात आले होते. काही भागातील कांदा अवकाळी पावसामुळे भिजला होता तर जेऊरपट्ट्यातील कांद्याला पाणी कमी पडले होते. असा कांदा वखारीत खराब होण्यास सुरुवात झाली आहे. बाजारात उत्तम दर्जाच्या कांद्याला सरासरी पंधराशे रुपये क्विंटल याप्रमाणे भाव मिळत आहे. वखारीतील कांदा खराब होत असून वजनात देखील घट होत आहे. त्यातच बाजार भाव नसल्याने शेतकरी आर्थिक अडचणीत सापडले आहेत.
शेतकऱ्यांच्या बांधावरील खरेदी सुरू असली तरी बांधावर व्यापाऱ्यांकडून सरासरी हजार रुपये ते तेराशे रुपये प्रतिक्विंटल पर्यंत कांदा खरेदी केला जात आहे. या भावाने कांदा विक्री केल्यास शेतकऱ्यांचा खर्च देखील वसूल होत नाही. खरीप पिकांबाबतही पावसाने दडी मारल्याने शेतकऱ्यांमध्ये चिंता आहे. खरिपाचे उत्पन्न हाती येईल याची शाश्वती नाही. तरी कांदा उत्पादक शेतकऱ्यांना अनुदान मिळण्याची मागणी शेतकरी वर्गांमधून होत आहे.