Rabbi Harbhara Lagvad: खरीप हंगामाच्या पिकांची आता काढणी सुरू झाली असून शेतकरी आता रब्बी हंगामाच्या तयारीला लागलेली आहेत. आपल्याला माहित आहे की महाराष्ट्रमध्ये रब्बी हंगामात मोठ्या प्रमाणावर गहू तसेच हरभरा, मका व कांद्याची लागवड जास्त करून केली जाते.
यामध्ये हरभरा पिक हे शेतकऱ्यांसाठी खूप फायद्याचे असे पीक असून कमी खर्चामध्ये शेतकऱ्यांना जास्तीत जास्त आर्थिक उत्पन्न मिळवणे या पिकाच्या माध्यमातून शक्य होते. तसे पाहायला गेले तर हा कालावधी हरभरा पेरणीचा आहे.
परंतु यावर्षी लांबलेल्या मान्सूनचा परतीचा प्रवास त्यामुळे राज्याच्या बऱ्याच भागात पडलेला पाऊस यामुळे बऱ्याच ठिकाणी शेतामध्ये पाणी साचून राहिल्याने हरभऱ्याची पेरणी अजूनपर्यंत होऊ शकलेली नाही.
आता कुठे बऱ्याच भागात काही प्रमाणात पाऊस थांबल्यामुळे या कालावधीत रब्बी पिकांच्या पेरणीला वेग येण्याची शक्यता आहे. त्यामुळे तुम्हाला देखील हरभरा पेरायचा असेल आणि तुमच्याकडे सिंचनाची व्यवस्था चांगली असेल तर तुम्ही 15 नोव्हेंबर पूर्वी हरभऱ्याची पेरणी करण्याचा प्रयत्न करावा असा सल्ला कृषी तज्ञांच्या माध्यमातून दिला जात आहे.
ज्या शेतकऱ्यांकडे पाण्याची व्यवस्था असेल अशा शेतकऱ्यांनी 20 ऑक्टोबर ते 15 नोव्हेंबर या कालावधीत हरभऱ्याची पेरणी पूर्ण करून घ्यावी. कारण कृषी तज्ञांच्या मते या कालावधीत हरभरा पेरणी केल्यामुळे हरभऱ्याचे उत्पादन जास्त मिळण्यासाठी उपयुक्त असलेले पोषक हवामानाचा पिकाला उपयोग होऊ शकतो.
वाफसा अवस्थेमध्ये हरभऱ्याची पेरणी करून घ्यावी व तुम्ही कोणते वाण निवडले आहे त्यानुसार हेक्टरी बियाण्याचे प्रमाण ठरवावे. उदाहरणच घ्यायचे झाले तर तुम्ही जर हरभऱ्याची विकास तसेच फुले जी-12 या हरभरा वाणाची लागवडीसाठी निवड केली असेल तर हेक्टरी 70 किलो बियाणे पुरेसे ठरते.
तसेच विश्वास व विजय या व्हरायटींची निवड केली असेल तर हेक्टरी 85 किलो बियाणे वापरावे व दिग्विजय तसेच विशाल व विराट या व्हरायटिंची निवड केली असेल तर 100 किलो हेक्टरी बियाणे वापरावे.
कशा पद्धतीने कराल नियोजन?
हरभरा लागवडीकरिता प्रमाणित व खात्रीशीर बियाण्याचा वापर करणे गरजेचे आहे. तसेच बियाण्यास बीजप्रक्रिया करावी व यामध्ये प्रति किलो बियाण्याला दोन ते अडीच ग्रॅम कार्बनडेझीम किंवा दोन ते अडीच ग्रॅम थायरम चोळावे.
तसेच हरभऱ्याची पेरणी करण्याअगोदर दहा किलो बियाण्यास 250 ग्रॅम रायझोबियम व स्फुरद जिवाणू संवर्धक चोळून घ्यावे बियाण्याला सावलीत सुकवून लगेच पेरावे. तसेच यामध्ये हरभरा करडई आंतरपीक पद्धत वापरली तर फायदा होतो.
खतव्यवस्थापन करताना बागायती हरभऱ्याला पेरणी करण्या अगोदर प्रतिहेक्टरी 25 किलो नत्र, 50 किलो स्फुरद, 32 किलो पालाश जमिनीत पेरून द्यावे. पाणी व्यवस्थापन करताना जमिनीत किती ओल आहे हे पाहून नियोजन करावे.
साधारणपणे जमिनीतील ओल पाहून पहिले पाणी 30 ते 35 दिवसांनी फांद्या फुटताना आणि दुसरे पाणी हे 60 ते 65 दिवसांनी हरभऱ्याला घाटे भरताना द्यावे.
तसेच प्रत्येक वेळी योग्य प्रमाणात पाणी व्यवस्थापन करावे व जास्त पाणी जर दिले गेले तर पिक उभळू शकते. तसेच पेरणी केल्यानंतर 21 दिवसांनी कोळपणी आणि एक खुरपणी करून पिक तणमुक्त ठेवण्याचा प्रयत्न करावा. गरज असेल तर हरभरा पीक फुलोऱ्यात येण्यापूर्वी दुसरी खुरपणी करून घ्यावी.