Farmer Success Story:- आता कृषी क्षेत्र पहिल्यासारखे पारंपारिक पद्धतीचे आणि उदरनिर्वाह पुरते राहिले नसून कृषी क्षेत्रामध्ये आता मोठ्या प्रमाणावर तंत्रज्ञानाचा वापर होऊ लागल्याने व त्यासोबतच वेगवेगळ्या प्रकारची फळ पिके घेण्याकडे शेतकऱ्यांचा कल दिसून येत असल्यामुळे शेती क्षेत्राचा पार चेहरा मोहराच बदलून गेलेला आहे.
जर आपण आजच्या शेतकऱ्यांची शेती बघितली तर तुम्हाला ती व्यावसायिक दृष्टिकोनातून दिसून येते व अचूक तंत्रज्ञान आणि व्यवस्थापनाच्या जोरावर निर्यातयोग्य फळ पिकांचे उत्पादन घेण्यामध्ये शेतकरी आता यशस्वी झालेले आहेत. सध्या शेतीमध्ये फळबागांची लागवड खूप मोठ्या प्रमाणावर वाढल्यामुळे
यामध्ये तंत्रज्ञानाच्या मदतीने दर्जेदार फळांचे उत्पादन घेऊन कृषी क्षेत्रातील निर्यातीचा आलेख देखील आपल्याला उंचावतांना दिसून येत आहे. याच मुद्द्याला धरून जर आपण करमाळा तालुक्यातील उमरड या गावचे अनिल आणि सुनील वलटे या दोन्ही भावांची यशोगाथा पाहिली तर इतर शेतकऱ्यांना खूप प्रेरणा देणारे आहे. या वलटे बंधूंनी निर्यातयोग्य अशा केळीचे उत्पादन घेऊन 20 टन केळी त्यांनी इराक आणि इराणला पाठवली आहे.
वलटे बंधूंच्या केळीने घेतली इराणला भरारी
याबाबत सविस्तर वृत्त असे की, करमाळा तालुक्यात असलेल्या उमरड या गावच्या सुनील वलटे व अनिल वलटे या दोन्ही भावांनी निर्यातक्षम असे दर्जेदार केळीचे उत्पादन घेतलेले असून त्यातील 20 टन केळी त्यांनी इराक आणि इराणला पाठवली असून 32 रुपये प्रति किलो प्रमाणे त्यांच्या केळीला दर मिळाला असल्याने या शेतकऱ्याने आनंद व्यक्त केला आहे.
सध्या जर केळी बाजारपेठ बघितली तर यामध्ये केळीचे उपलब्धता कमी असल्यामुळे केळीला चांगल्या पद्धतीचा बाजार भाव मिळताना दिसून येत असल्याने केळी उत्पादक शेतकऱ्यांमध्ये सध्या आनंदाचे वातावरण आहे. वलटे बंधूंच्या दृष्टिकोनातून बघितले तर त्यांनी करमाळा तालुक्यातील केडगाव येथे तीन एकर क्षेत्रावर केळी रोपांची लागवड केलेली होती.
ज्या शेतामध्ये त्यांनी केळीची लागवड केली या शेतामध्ये अगोदर त्यांनी कांद्याचे पीक घेतले होते व त्यामुळे त्या शेताचा पोत देखील उत्तम प्रकारचा होता. तसेच त्यासाठी शेणखताचा वापर करून मशागत केलेली होती.
या केळी पिकासाठी खतांचे व्यवस्थापन करताना त्यांनी ठिबक सिंचनाद्वारे विद्राव्य खतांचा वापर केल्याने केळी पिकाला याचा खूप मोठा फायदा झाला व जोमदार पद्धतीने पीक शेतात उभे राहिले.
तसेच वेळोवेळी फ्रुट केअर करून पाणी व खत व्यवस्थापन योग्य पद्धतीने ठेवल्यामुळे 11 महिन्यात केळी काढणीला आली. सध्या निर्यातयोग्य केळीला आखाती देशांमध्ये खूप चांगली मागणी असल्यामुळे व लागणारी अपेक्षित केळी शेतकऱ्यांकडे उपलब्ध नसल्यामुळे केळीला चांगला बाजारभाव मिळत आहे.
25 ते 30 लाख रुपये उत्पन्न मिळण्याची अपेक्षा
वलटे बंधूंनी पिकवलेली ही दर्जेदार केळी कंदर येथील बालाजी पाटील या व्यापाऱ्याने शेतामध्ये येऊन प्रतिक्रिलोला 32 रुपयांचा दर ठरवून एकाच दिवशी 20 टन केळीची काढणी करून ती परदेशात निर्यातीसाठी पाठवली आहे. वलटे बंधूंना 50 टन केळीचे उत्पादन अपेक्षित असून जर असाच दर मिळाला तर त्यांना 25 ते 30 लाख रुपयांचे केळीपासून उत्पन्न मिळेल अशी अपेक्षा आहे.