आळे येथील कान्हू गाढवे यांचा अनोखा आहे दुग्ध व्यवसाय! 60 गायींपासून रोज मिळते 500 लिटर दुधाचे उत्पादन,दूध संघाने केला सन्मान

शेती व्यवसायाशी संबंधित असलेले जर आपण जोडधंदे बघितले तर यामध्ये पशुपालन हा व्यवसाय फार पूर्वापारपासून भारतात केला जातो व आता या व्यवसायामध्ये देखील तंत्रज्ञान मोठ्या प्रमाणावर आल्यामुळे व गाई तसेच म्हशीच्या अनेक दर्जेदार जाती विकसित केल्यामुळे व्यावसायिक दृष्टिकोनातून हा व्यवसाय आता शेतकरी करू लागले आहेत.

Ajay Patil
Published:
dairy business

Dairy Business Success Story:- शेती व्यवसायाशी संबंधित असलेले जर आपण जोडधंदे बघितले तर यामध्ये पशुपालन हा व्यवसाय फार पूर्वापारपासून भारतात केला जातो व आता या व्यवसायामध्ये देखील तंत्रज्ञान मोठ्या प्रमाणावर आल्यामुळे व गाई तसेच म्हशीच्या अनेक दर्जेदार जाती विकसित केल्यामुळे व्यावसायिक दृष्टिकोनातून हा व्यवसाय आता शेतकरी करू लागले आहेत.

यामध्ये गायींचे पालन देखील मोठ्या प्रमाणावर केले जाते. गाईंच्या दृष्टिकोनातून बघितले तर सध्या जर्सी तसेच होलेस्टीयन फ्रिजियन सारख्या गाई विकसित केल्यामुळे गाईंचे पालन दुग्ध व्यवसायाच्या दृष्टिकोनातून खूप फायद्याचे ठरताना दिसून येत आहे.

या व्यवसायाच्या माध्यमातून अनेक शेतकऱ्यांनी आर्थिक प्रगती साधली असून अनेक प्रकारचे दुग्ध प्रक्रिया उद्योग देखील उभारले आहेत. या मुद्द्याला धरून जर आपण जुन्नर तालुक्यातील आळे येथील शेतकरी कान्हू नामदेव गाढवे या शेतकऱ्याचे उदाहरण बघितले तर ते इतरांना नक्कीच प्रेरणादायी असे आहे.

या शेतकऱ्याने 60 गायींचे पालन केले असून त्या माध्यमातून तो दररोज 500 लिटर दुधाचे उत्पादन मिळवत आहे. या व्यवसायाच्या माध्यमातून त्यांनी मोठ्या प्रमाणावर आर्थिक प्रगती साधली आहे.

60 गाईपासून मिळते दररोज 500 लिटर दूध उत्पादन
याबाबत सविस्तर वृत्त असे की, जुन्नर तालुक्यात असलेल्या आळे येथील प्रगतिशील शेतकरी कान्हू नामदेव गाढवे यांनी जिद्द, चिकाटी तसेच नियोजनबद्ध व्यवस्थापन तसेच संगोपन ठेवून 60 गाईंचे चारा तसेच आरोग्य व इतर व्यवस्थापनाच्या दृष्टिकोनातून योग्य काळजी घेत दूध व्यवसायातून लाखो रुपये कमावण्याची किमया साध्य केली आहे.

ते दररोज पाचशे लिटर दुधाचे उत्पादन या व्यवसायातून मिळवतात व त्यामुळे त्यांना मोठ्या प्रमाणावर आर्थिक समृद्धीच्या दिशेने वाटचाल करता येणे सहज शक्य झाले आहे.

आळे येथील दूध डेअरीमध्ये वर्षभरात एक लाख 89 हजार 700 लिटर दूध घालून प्रथम क्रमांक त्यांनी मिळवला असून आळे सहकारी दूध संस्थेच्या वार्षिक सर्वसाधारण सभेत त्यांचा सत्कार देखील करण्यात आला.

अशा पद्धतीने केली व्यवसायाला सुरुवात
जर आपण कान्हू गाढवे यांची शैक्षणिक पार्श्वभूमी बघितली तर त्यांचे शिक्षण बारावीपर्यंत झालेले आहे. त्यामुळे नोकरीच्या मागे न लागता व्यवसाय करण्याचा निर्धार त्यांनी मनात पक्का केला व 2000 मध्ये 16 हजार रुपये किमतीची एका गाईची खरेदी केली व या व्यवसायामध्ये पाऊल ठेवले.

आज कष्टाच्या जोरावर एका गाईच्या साथीने आज त्यांच्याकडे गोठ्यात 45 मोठ्या तर पंधरा छोटे अशा साठ जर्सी गाई आहेत. तसेच गोठा व्यवस्थापनाच्या दृष्टिकोनातून बघितले तर बारा गुंठ्यामध्ये 120x 115 फुटाचा मुक्त गोठा देखील त्यांनी बांधला आहे. या व्यवसायामध्ये त्यांना त्यांच्या आई पार्वती बाई व पत्नी प्रमिलाबाई यांची खूप मोठी साथ मिळताना दिसून येते.

तसेच गाईंना दररोज लागणाऱ्या चारा व्यवस्थापनाकरिता त्यांनी सात एकर जमीन खंडाने घेतली असून यामध्ये चाऱ्यासाठी हत्ती गवत तसेच मका लागवड ते करतात. गाईंच्या खाद्यासाठी ते जवळपास 100 टन इतका मुरघास तयार करून ठेवतात व अतिशय चांगल्या पद्धतीने ते गाईंचे व्यवस्थापन करतात.

या गाईंपासून त्यांना दररोज 500 लिटर दुधाचे उत्पादन मिळत असून तीन दिवसाला एक ट्रॉली शेणखत देखील मिळते. शेतीमाल तसेच शेतीची सध्याची स्थिती बघता शेतीला काहीतरी जोडधंद्याची साथ असणे खूप गरजेचे आहे.

कर्ज घेऊन त्यांनी एक गाय विकत घेतली व एका गायीच्या माध्यमातून आज त्यांचा प्रवास 60 गाई पर्यंत पोहोचला आहे. इतकेच नाही तर या व्यवसायाच्या जोरावर त्यांनी शेती देखील घेतली व बंगला देखील बांधला आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe