KCC Update :- शेती आणि शेतकऱ्यांचा विकास या दृष्टिकोनातून जर विचार केला तर केंद्र आणि राज्य सरकारच्या माध्यमातून अनेक प्रकारच्या योजना राबवल्या जातात. प्रत्येक योजनांसाठी लाभार्थी पात्रतेच्या काही अटी असून पात्रतेचे निकष पूर्ण करणाऱ्या लाभार्थ्यांना या योजनांचा लाभ दिला जातो. परंतु बऱ्याचदा असे होताना दिसते की योजनांचे खरे लाभार्थी वेगळे राहतात व इतर व्यक्ती या योजनांचा फायदा उठवताना आपल्याला दिसतात.
त्यामुळे पात्र लाभार्थी योजनांपासून वंचित राहण्याची शक्यता बळावते. या मुद्द्याला धरून जर आपण उदाहरण घेतले तर पंतप्रधान किसान सन्माननिधी योजनेच्या संदर्भात बऱ्याच अपात्र अशा लाभार्थ्यांनी या योजनेचा फायदा घेतल्याचे दिसून आले होते व त्यानंतर मात्र सरकारने कठोर पावले उचलत अशा शेतकऱ्यांच्या याद्या जाहीर केल्या होत्या व त्यांच्याकडून घेण्यात आलेले पीएम किसानचे हप्ते परत घेण्याची प्रक्रिया देखील सुरू करण्यात आली होती.
अगदी हीच बाब पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेचे संबंधित असलेल्या पीएम किसान क्रेडिट कार्ड योजनेत देखील दिसून आलेली आहे. किसान क्रेडिट कार्डच्या संबंधात देखील एका व्यक्तीच्या नावे एकापेक्षा जास्त किसान क्रेडिट कार्ड आढळून आल्याचे समोर आलेले आहे.
तर किसान क्रेडिट कार्ड केले जाईल रद्द
किसान क्रेडिट कार्डच्या संबंधित विचार केला तर या योजनेमध्ये देखील अनेक गैरप्रकार दिसून येत असून एकाच शेतकऱ्याच्या नावाने एका पेक्षा जास्त किसान क्रेडिट कार्ड जर आढळून आले तर ते ताबडतोब रद्द करण्याचे आदेश देण्यात आलेले आहेत.एवढेच नाही यामध्ये बँक आणि शेतकऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्याची देखील शक्यता आहे.
यामध्ये करण्यात आलेल्या तपासामध्ये दिसून आले आहे की एकाच नावाचे अनेक किसान क्रेडिट कार्ड जारी करण्यात आलेले आहेत व त्यामुळे जे पात्र लाभार्थी आहेत त्यांना या कार्डचा लाभ मिळू शकत नाही. बँकेचे खाती हे आधार कार्डशी संलग्न करण्यात आले तेव्हापासून असे प्रकरणे समोर आलेले आहेत.
यामध्ये असे अनेक शेतकरी आहेत की ज्यांनी अनेक बँकांकडून किसान क्रेडिट कार्ड बनवलेले आहेत. परंतु जर किसान क्रेडिट कार्ड च्या बाबतीत आपण रिझर्व बँक ऑफ इंडियाचे नियम पाहिले तर त्यानुसार एका शेतकऱ्याला फक्त एकच किसान क्रेडिट कार्ड जारी केले जाऊ शकते. जर एकापेक्षा जास्त किसान क्रेडिट कार्ड सापडली तर ती रद्द केली जातील.
किसान क्रेडिट कार्ड हे शेतकऱ्यांसाठी खूप महत्त्वाचे असून अनेक शेतीशी निगडित असलेल्या आर्थिक बाबी आणि घरातील इतर महत्त्वाच्या आर्थिक बाबी या किसान क्रेडिट कार्डच्या माध्यमातून पूर्ण होऊ शकतात. परंतु अशा प्रकारामुळे पात्र लाभार्थी अशा योजनांपासून वंचित राहत असून गरज नसलेल्या व्यक्तींना या योजनांचा फायदा होत असल्याचे दिसून येत आहे. यामुळे सदर प्रकरण आता सरकारने गांभीर्याने घेतले असून एकापेक्षा जास्त किसान क्रेडिट कार्ड एकाच नावावर असतील तर ते किसान क्रेडिट कार्ड रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.